पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/135

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१११

केलेलें दृष्टीस पडते. फत्तेगड येथून बायजाबाईनीं, श्रीभागीरथीच्या तीरीं शृंगीरामपूर क्षेत्रीं राहाण्याबद्दल आपला मानस गव्हरनरजनरलसाहेबांस कळविला, परंतु तीही त्यांची विनंति मान्य झाली नाहीं. बायजाबाईसाहेब ह्या इ. स. १८३५ सालच्या अखेरपर्यंत फत्तेगड येथेंच होत्या. नंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर ह्यांनीं त्यांना काशीस किंवा दक्षिणेंत जाण्याबद्दल सक्तीचा हुकूम पाठविला; व तो अमलांत आणण्यास त्यांस एक महिन्याची मुदत दिली. त्याप्रमाणें त्यांचे निघणें न झाल्यामुळें त्यांस क्याप्टन रॉस ह्यांनी लष्करी साहाय्यानें फरुकाबादेहून अलहाबादेस आणिलें.

 नंतर कांहीं दिवस बायजाबाईसाहेबांनी अलहाबाद येथे व बनारस येथें वास केला. पुढे इ. स. १८४० सालीं हिंदुस्थान सरकारनें मुंबई सरकारच्या परवानगीनें त्यांस गोदावरी नदीच्या कांठीं नासिक येथें राहण्याची मोकळीक दिली व चार लक्ष रुपये पेनशन करून दिलें. त्याप्रमाणें बायजाबाईसाहेब दक्षिणेंत येऊन नासिक येथे राहिल्या. इ. स. १८४० पासून इ. स. १८४५ पर्यंत त्यांचे वास्तव्य दक्षिणेंतच होतें.

 मध्यंतरीं ता. ७ फेब्रुवारी इ. स. १८४३ रोजी महाराज जनकोजीराव शिंदे हे मृत्यु पावले. मृत्युसमयीं त्यांची इच्छा बायजाबाईसाहेब ह्यांस भेटावे अशी फार होती. परंतु त्यांस ब्रिटिश सरकारची परवानगी न मिळाल्यामुळे तो योग घडून आला नाहीं. मृत्यूपूर्वीं महाराजांस आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप होऊन, बायजाबाईसाहेबांची माफी मागावी व आपला राज्यकारभार पुनः त्यांचे स्वाधीन करावा, असाही सुविचार उत्पन्न झाला होता, असें ह्मणतात.

 महाराज जनकोजीराव ह्यांस औरस संतती नसल्यामुळें ब्रिटिश सरकारच्या परवानगीनें दरबारचे मुत्सद्दी कृष्णराव मामासाहेब कदम ह्यांनी त्यांच्या अल्पवयी महाराणी ताराबाई ह्यांचे मांडीवर शिंद्यांच्या