पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/142

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११८
स्वभाव.

 सर्जेराव घाटगे यांचा स्वभाव क्रूर व तामसी असल्यामुळें त्यांच्या प्रमाणेंच त्यांच्या कन्येचा स्वभाव असेल, असें समजून पुष्कळ लोक बायजाबाईंस क्रूर व जुलमी राजस्त्रियांच्या मालिकेंत गोंवितात. परंतु वास्तविक त्यांचा स्वभाव तशा प्रकारचा नव्हता. त्या 'मानोहि महतां धनम्' ह्या कोटींतल्या असल्यामुळें फार मानी व पाणीदार होत्या. त्यामुळें त्यांच्या वृत्तीमध्यें थोडासा तापटपणा आला होता. त्याचप्रमाणें त्यांची कदर प्रखर असल्यामुळें त्या विशेष करारी व दृढनिश्चयी अशा भासत होत्या. परंतु सर्जेरावांचे दुर्गुण त्यांचे अंगांत वसत होते असें दिसत नाहीं. मिल्लसाहेबांनी बायजाबाईंच्या राज्यकारभाराविषयीं लिहितांना, "ती स्वभावाने कडक होती, तथापि क्रूर किंवा खुनशी नव्हती." ह्मणून त्यांच्या स्वभावाचें जें वर्णन केलें आहे, तेंच खरें आहे. त्यांना मानहानि किंवा उपमर्द सहन होत नसे. त्याबद्दल मात्र त्या कडक शिक्षा देत असत. परंतु, विनाकारण अनाथाचा छल करणें, किंवा अन्यायानें प्रजेस पीडा देणें, वगैरे प्रकार त्यांचे हातून कधी घडल्याचें आढळून येत नाहीं. एवढेच नव्हे, तर प्रजेस सुख देण्याविषयीं व गरीब लोकांवर उपकार करण्याविषयीं त्या सदोदित दक्ष असत.

औदार्य.

 बायजाबाईसाहेब ह्यांच्याजवळ द्रव्य विपुल होतें व कांहीं अंशीं तेंच त्यांच्या त्रासास मुख्य कारण झालें होतें. तथापि त्यांनी आपल्या द्रव्याचा पुष्कळ चांगल्या रीतीनें व्यय केला. त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत तीर्थयात्रा केल्या व अनेक ठिकाणीं बहुत दानधर्म केला. काशी येथे त्यांनी एक सुंदर घाट बांधिला आहे, व पंढरपूर मुक्कामीं श्रीद्वारकाधीशाचें मंदिर बांधिलें आहे. काशी येथील बायजाबाईंचा घाट अवलोकन