पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/143

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११९

करून मिसेस फेनी पार्क्स ह्यांनी असें लिहिलें आहे कीं, "बायजाबाईंचा घाट पाहण्यापूर्वीं मला असें वाटत होतें कीं, चिमाजीआपा पेशव्यांचा घाट सर्वांत उत्तम आहे. परंतु बायजाबाई जो घाट बांधीत आहेत, तो पाहिला ह्मणजे त्याच्यापुढें पहिल्याचें सौंदर्य लुप्त होतें. ह्या घाटाचा आकार इतका विस्तृत, इतका सुंदर, इतका साधा आणि इतका प्रमाणशुद्ध आहे कीं, तो पाहून मला फार हर्ष झाला. काशींतील सर्व घाटांमध्ये हा घाट अतिशय सुंदर आहे ह्यांत शंकाच नाहीं." ह्या घाटाकरितां बायजाबाईंनी ३७ लक्ष रुपये खर्च करण्याचा संकल्प केला होता; परंतु त्यांच्या द्रव्यावर मध्यंतरीं विघ्नें आल्यामुळें त्यांच्या हेतूप्रमाणें काम झालें नाहीं. पंढरपूर येथील द्वारकाधीशाचें मंदिरही असेंच सुंदर आहे. ह्यासही सुमारें दोन लक्ष रुपये खर्च झाला. हें देऊळ इ. स. १८४९ सालीं बांधण्यात आलें. काशी, पंढरपूर वगैरे क्षेत्रीं बायजाबाईसाहेबांनी अन्नछत्रें स्थापन केलीं होतीं, व तेथील देवालयांस देणग्या व उत्पन्नें पुष्कळ दिलीं होतीं. त्यांच्या दानधर्माची व देवस्थानांस दिलेल्या वर्षासनांची बरोबर माहिती मिळाली नाहीं. तथापि त्यांचें औदार्य थोर असून त्यांनीं बहुत धर्मकृत्यें केलीं व सर्व जनांवर उपकार केले, असें स्थूलमानानें ह्मणण्यास हरकत नाहीं.

आवड.

 बायजाबाईसाहेबांस घोड्यावर बसण्याची फार षोक असे. मि. फेनी पार्क्सबाई ह्यांनीं बायजाबाईंचे बसण्याचे घोडे पाहिले होते. त्यांना घोड्यावर बसण्याचा नाद विशेष असून त्या अश्वपरीक्षेंत फार निपुण होत्या, असें त्यांनीं वर्णन केलें आहे. त्यांचा घोड्यावर बसून फेरफटका करण्याचा नित्यक्रम असे. कोणी आंग्ल स्त्रिया त्यांस भेटण्यास गेल्या, ह्मणजे त्यांना घोड्यावर बसतां येतें कीं नाहीं, ह्याची चौकशी केल्यावांचून त्या राहत नसत; एवढेंच नव्हे, तर त्या त्यांची परीक्षाही घेत