पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/144

हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२०

असत. त्याचप्रमाणें युद्धवार्ता विचारण्यांत त्यांना नेहमीं आनंद वाटत असे. मिसेस ड्युबर्ली नामक एका आंग्ल स्त्रीस त्यांनीं रशियांतील युद्धाच्या गोष्टी विचारिल्या होत्या. त्यांना आपण घोड्यावर बसण्यांत पटाईत आहों हें सांगण्यांत फार भूषण वाटत असे. नेहमी त्या वेलस्ली साहेबांच्या वेळच्या युद्धाच्या गोष्टी सांगत; आणि रणांगणांतून घोड्यावर बसून आपण कसें निसटून आलों, ते मोठ्या कौतुकानें व गर्वाने निवेदन करीत[] . त्यांनीं आपल्या जवळच्या सर्व दासींना व सरदारांच्या स्त्रियांना घोड्यावर बसण्यास शिकविलें होतें, व बायकांच्या घोडेस्वारांची एक स्वतंत्र पलटणही तयार केली होती.

 बायजाबाईंच्या आवडीबद्दल मिसेस फेनी पार्क्स ह्यांच्या प्रवासवृत्तामध्यें एक मौजेचा उल्लेख आहे. ही आंग्ल स्त्री ज्या वेळीं इंग्लंडास परत गेली, त्या वेळीं बायजाबाईंनीं तिला आपल्या आवडीच्या तीन वस्तू इंग्लंडाहून पाठविण्याबद्दल सांगितलें होतें. त्या येणेंप्रमाणे :- १ एक अतिशय उमदी व अस्सल जातीची आरबी घोडी. २ एक अगदीं चिमुकलें–चेंडूएवढें, सफेत रंगाचें, लाल डोळ्यांचें व लांब केंसाचें कुत्रें. आणि ३ एक वाद्य वाजविणारी कळसूत्री बाहुली !


  1.  १ बायजाबाईसाहेब ह्या घोड्यावर बसण्यांत पटाईत असून त्यांनी समरांगण पाहिलें होतें असा उल्लेख दोन आंग्ल स्त्रियांनी केला आहे. मिसेस फेनी पार्क्स ह्यांनी पुढील लेख लिहिला आहे:-
     "The ladies relate, with great pride, that in one battle, her Highness rode at the head of her troops, with a lance in her hand, and her infant in her arms!"
     मिसेस ड्युबर्ली ह्यांनी खुद्द बायजाबाईंच्या तोंडचेच पुढील उद्गार दिले आहेत :-
     "I too, have ridden at a battle: I rode when Wellesley Saib drove us from the field, with nothing but the saddles on which we sat."