पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/150

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६

जनरलसाहेबांच्या काटकसरीच्या कारकीर्दीमध्यें कलकत्याच्या खजिन्यांत जो अतिशय द्रव्यसंचय झाला होता, तो सर्व संपून गेला. त्यामुळें गव्हर्नरजनरल लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांस कोठून तरी व कसें तरी द्रव्य लवकर मिळविलें पाहिजे, अशी जरूरी वाटूं लागली. अयोध्येच्या नबाबाजवळून पैसा मागतां येईना. त्यानें ५०|६० लक्ष रुपये नुकतेच उसने दिले होते, व त्याबद्दल नेपाळ संस्थानांकडून मिळालेला थोडासा प्रांत त्यास मोबदला दिला होता. तेव्हां कलकत्त्याच्या एका लोहचुंबकाच्या (द्रव्याकर्षण करणाऱ्या गव्हरनरजनरलसाहेबांच्या) मनांत अशी कल्पना आली कीं, आपण शिंद्यांकडून काय मिळतें ते पहावें. मराठे लोक हे फार कृपण आहेत, व त्यांचे यजमान शिंदे सरकार ह्यांच्या खजिन्यांत दोन तीन कोटी रुपये पुरून ठेविलेले आहेत, असें ह्मणतात. तेव्हां बायजाबाई ह्या कंपनी सरकारास दहापांच लक्ष रुपये कशावरून सहज देणार नाहींत ? ह्याप्रमाणें गव्हरनर जनरलसाहेबांच्या मनांत विचार आला; व तो त्यांनी युक्तीने सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला. ह्या वेळी शिंद्याच्या दरबारी कर्नल स्टुअर्ट हे फार हुशार व राजकारणी गृहस्थ रेसिडेंट होते. त्यांच्याकडे महाराणी बायजाबाईसाहेबांकडून हें द्रव्य उकळण्याचें नाजूक काम गुप्त रीतीने सोपविण्यांत आलें.

 प्राणिशास्त्रावरील कोणत्याही प्रसिद्ध ग्रंथामध्यें विसल नांवाचा प्राणी झोपी गेल्याचा कोठें उल्लेख सांपडत नाहीं; परंतु एखाद्या दक्ष पारध्यास तें गाढ निद्रेत असलेलें कदाचित् सांपडले असेल, असेंही आपण खरें समजूं; परंतु बायजाबाई कधीं निद्रित असलेली एकाही रेसिडेंटास आढळून आली असेल किंवा नाहीं, ह्याची मात्र शंका आहे. कारण, ती डोळ्यांमध्ये तेल घालून रेसिडेन्सीमधील गुप्त राजकारणे एकसारखी पाहत असे.

 बायजाबाईमध्यें आशिया खंडांतील लोकांचे सर्व गुण वसत होते. एवढेंच नव्हे, तर तिच्यामध्यें आणखी काही विशेष गुण होता. ती फार