पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/153

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२९

तील जुन्या पद्धतींचा फार अभिमान असे, व त्या पाळण्याविषयीं त्या फार दक्ष असत. एके प्रसंगीं महाराज जयाजीराव शिंदे बायजाबाईसाहेबांस भेटण्याकरितां मुद्दाम उज्जनीस गेलें. त्यांच्याबरोबर लवाजमा अगदीं बाताबेताचा असून त्यांचा सर्व पोषाख इंग्रजी नमुन्याचा- बूट पाटलुणीचा- होता. महाराज प्रवासाच्या श्रमानें थकून गेले होते; ह्मणून ते त्याच पोषाखानिशीं बाईसाहेबांस भेटण्याकरितां एकदम राजवाड्यांत गेले. तेव्हां त्यांनीं, महाराजांचा पोषाख वगैरे शिंदे सरकारास शोभण्यासारखा नाहीं व राजकीय इतमाम त्यांच्याबरोबर नाहीं असें पाहून, महाराजांची भेट घेतली नाहीं; आणि असा निरोप पाठविला कीं, "चाबुकस्वारास मी भेटत नाहीं. महाराज शिंदे मला भेटण्यास येतील, तेव्हां त्यानं त्यांजबरोबर यावें. शिंदे सरकार इतमामावांचून कधींही येणार नाहींत." नंतर महाराज जयाजीराव हे आपल्या दरबारी चालीप्रमाणें भालदार चोपदार ललकारत, सर्व लवाजमा व स्वारीचीं राजचिन्हें बरोबर घेऊन, मोठ्या थाटानें बाईसाहेबांस भेटण्यास गेले. नंतर बाईसाहेबांनी त्यांची भेट घेऊन स्वागतपूर्वक त्यांचा गौरव केला. ह्या दिवसापासून महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनीं आपल्या स्वदेशी रीतिरिवाजांत कधींही अंतर पडूं दिले नाहीं असें ह्मणतात.

बायजाबाईसाहेबांचे बंधु.

 बायजाबाईसाहेबांचे बंधु जयसिंगराव ऊर्फ हिंदुराव बाबा घाटगे ह्यांची थोडीशी माहिती बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीच्या पांचव्या भागांत दिली आहे. तथापि त्यांचा संबंध बायजाबाईसाहेबांच्या जीवनचरित्रांत विशेष असल्यामुळें त्यांच्याबद्दल आणखी थोडी माहिती सादर करणें अवश्य आहे. हिंदुराव बाबा घाटगे हे बायजाबाईसाहेबांच्या हातीं सर्व राज्यसूत्रे असतांना त्यांचे मुख्य मसलतदार होते, व त्यांचे बायजाबाईसाहेबांच्या दरबारीं विशेष वजन होतें. पुढें बायजाबाई