पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/156

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२

राजकीय गोष्टींसंबंधानें विचार करण्याकरितां दरबार भरला होता. त्या वेळीं गव्हरनरजनरल लॉर्ड ऑक्लंड हे इंग्रजांच्या बाजूने व महाराज रणजितसिंग हे शीख लोकांच्या वतीनें आले होते. त्यांमध्ये हिंदुरावही एक सभासद होते. ते, गव्हरनरजनरल व महाराज रणजितसिंग ह्यांच्या भेटीच्या वेळीं एकदम पुढें जाऊन बसले. त्या वेळीं एका शीख सरदारानें त्यांस प्रश्न विचारला कीं, "आपण इंग्रज सरकाराचे एक पेनशनरच आहांत ना?" त्या वेळीं हिंदुरावांनी असें खोंचदार उत्तर दिलें कीं, "होय, मी इंग्रजांचा पेनशनर आहे; व आपणही आमच्यासारखे लवकरच व्हाल!” हें उत्तर ऐकून तो स्वाभिमानी शीख सरदार मनांतल्यामनांत ओशाळा झाला.

 हिंदुराव बाबा इ. स. १८५६ मध्यें मृत्यु पावले. पुढे इ. स. १८५७ सालीं दिल्ली येथें बंड झालें. त्या वेळीं हिंदुरावांचा वाडा ही एक युद्धांतील माऱ्याची जागा होऊन राहिली होती. येथें फार घनघोर युद्ध झालें. त्यावरून दिल्ली येथील बंडाच्या इतिहासांत हिंदुरावांच्या वाड्याचें नांव प्रसिद्धीस आलें. त्यामुळें हिंदुराव हेही बंडवाले होते असा युरोपियन लोकांचा समज होऊन, पुष्कळ ग्रंथकारांनीं त्यांस पुनः जीवंत करून लढावयास लाविलें आहे !! परंतु तें सर्व चुकीचें आहे. हिंदुराव बाबा ह्यांनीं कागल येथें बांधलेला राजवाडा व किल्ला अद्यापि अस्तित्वांत आहे; व त्यांचे वंशज श्रीमंत पिराजीराव बापूसाहेब घाटगे सर्जेराव बजारत-मा-आब हे तेथील जहागिरीचा उपभोग घेत आहेत.


बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 156 crop)