बायजाबाईसाहेब दक्षिणेंतून आल्यानंतर बहुतकरून ग्वाल्हेरीस राहत होत्या. त्यांचा वृद्धापकाळ झाला होता; तथापि त्यांचें शरीर तेजःपुंज असून त्यांच्या शक्ती विगलित झाल्या नव्हत्या. त्यांचा उत्साह व त्यांची ताकद कायम असून, त्यांचा घोड्यावर बसण्याचा नित्यक्रम अव्याहत चालू होता. मित आहार, नियमित व्यायाम, व्यवस्थित वर्तन आणि सत्कार्यीं कालक्षेप असा बायजाबाईसाहेबांचा आयुष्यक्रम असल्यामुळें त्यांचे आरोग्य कायम राहिलें होतें. त्यांचें सत्तर वर्षांचे वय झालें होतें, तथापि त्यांची स्मरणशक्ति खंबीर असून त्यांची सर्व नैमित्तिक कृत्यें अगदी व्यवस्थितपणानें चालत असत. त्यांस इंग्रज सरकाराकडून दोन लक्ष व शिंदे सरकाराकडून चार लक्ष मिळून एकंदर सहा लक्ष रुपये पेनशन मिळत असे. ह्या पेनशनाची त्या स्वतः उत्तम व्यवस्था ठेवीत असत. त्यांचा इतमाम, त्यांचा शागीर्दपेशा, आणि त्यांचा दानधर्म त्यांच्या वैभवास व मोठेपणास शोभेल असाच होता. तथापि त्यांच्या दक्षतेमुळें त्यांस कधींही कर्ज न होतां, उलट त्यांच्या संग्रहीं द्रव्यसंचय फार मोठा झाला होता. उत्तरोत्तर त्यांचे मन ऐहिक व्यवहार व राजकारणें ह्यांपासून पराङ्मुख होऊन, कथापुराण व ईश्वरभक्ति ह्यांच्याकडे विशेष लागलें होतें. तथापि, ग्वाल्हेरच्या राजकारणांत त्यांनी आपले अद्वितीय बुद्धिचातुर्य पूर्वीं व्यक्त केलें असल्यामुळें त्यांच्या शहाणपणाविषयीं व त्यांच्या राजकारस्थानपटुत्वाविषयीं शिंदे
पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/157
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ९ वा.
कसोटीचा प्रसंग.