पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/159

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३५

प्रामाणिकपणा हे गुण व्यक्त झाले, हें सर्व ठीक झालें. परंतु ह्यापेक्षांही बायजाबाईसाहेबांच्या वर्तनांत अधिक प्रशंसनीय आणि अधिक तेजस्वी असा गुण दिसून आला. तो त्यांचे मानसिक औदार्य हा होय. बायजाबाईसाहेबांचा व ब्रिटिश सरकाराचा पूर्वींचा राजकीय संबंध लक्ष्यांत घेतला, तर त्यांनी ब्रिटिश सरकाराशीं जें वर्तन केलें, त्यांत केवळ मनुष्यस्वभावास भूषणप्रद होणारी अशी साधुवृत्ति दर्शविली, असे ह्मटलें असतां खचित अतिशयोक्ति होणार नाहीं. दुसऱ्यानें कितीही अपकार केले, तरी ते विसरून, त्याच्यावर पुनः उपकार करणे, ही साधुरीति होय, असें कोण ह्मणणार नाहीं ?

 बायजाबाईसाहेब व ब्रिटिश सरकार ह्यांच्यामध्ये मागें जीं अनेक राजकारणें झाली, त्यांच्या बरेवाईटपणाबद्दल चर्चा करण्याचें प्रयोजन नाहीं. शिवाय, त्या राजकीय गोष्टी असल्यामुळें त्यांतील सत्य प्रकार प्रकाशांत येणे शक्य नाहीं. तथापि, स्थूल मानानें इतके ह्मणतां येईल कीं, हीं सर्व राजकारणें न्यायी व दयाळू राजनीतीच्या विरुद्ध असून त्यांच्यायोगानें बायजाबाईसाहेबांच्या मनांतील ब्रिटिश सरकाराविषयींचा प्रेमभाव नाहींसा होणें अगदीं साहजिक होतें. बायजाबाईसाहेब ह्या फार महत्वाकांक्षी व राजव्यवहारचतुर अशा स्त्रीमालिकेंत अग्रस्थानीं शोभणाऱ्या असून, त्यांस ग्वाल्हेरचा राज्यकारभार चालविण्याची फार उमेद होती. गव्हरनरजनरल लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांनी दौलतराव शिंद्यांच्या इच्छेप्रमाणें बायजाबाईसाहेबांच्या हातीं सर्व राज्यकारभार सोपविला होता; व त्यांचे अनुयायी लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांनी त्यांस स्वतंत्र रीतीनें राज्यकारभार चालविण्याबद्दल कुल आखत्यार दिला होता. असें असून, इ. स. १८३३ सालीं त्यांना एकाएकीं अधिकारच्युत केलें, ही गोष्ट ह्या स्वाभिमानी राजस्त्रीस बिलकूल आवडली