पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/165

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४१

महाराणी बायजाबाईसाहेब ह्या होत. ह्यांचें ग्वाल्हेर येथें चांगलें वजन असून त्यांचें नांव सर्वत्र महशूर झाले होते. बंड होण्यापूर्वीं साठ वर्षें, 'दक्षिणची सौंदर्यलतिका' ह्मणून त्यांची प्रसिद्धि असून, इ. स. १७९७ सालच्या विजयी दौलतराव शिंद्यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांनी साठ वर्षेंपर्यंत आपल्या आयुष्यांतील विविध स्थित्यंतरांचा अनुभव घेतला होता. व लग्न झाल्यानंतर तीस वर्षेंपर्यंत आपल्या यजमानावर व ग्वाल्हेरच्या दरबारावर वर्चस्व चालवून, पूर्वेकडील स्त्रियांचे ठिकाणीं सामान्यतः जी कार्यक्षमता दृष्टीस पडते, त्यापेक्षां अधिक कार्यक्षमता दाखविली होती. इ. स. १८२७ मध्यें दौलतराव शिंदे हे निपुत्रिक मरण पावले. त्यांच्या पश्चात् हिंदु चाली प्रमाणें बायजाबाईसाहेबांनीं शिंद्यांच्या कुलांतला एक मुलगा दत्तक घेतला, आणि त्यास गादीचा धनी केलें. बायजाबाईसाहेब ह्या मुख्य राज्यसूत्रचालक व मुकुटराव हे भावी राजे असे बनल्यानंतर, त्यांच्यामध्ये सात वर्षेंपर्यंत अनेक तंटेबखेडे झाले. शेवटीं, इ. स. १८३४ सालीं, मुकुटरावांस गादी मिळाली, वबायजाबाईसाहेबांस राज्यत्याग करून धोलपुरास जाणे भाग पडलें. तथापि, बायजाबाईसाहेब ह्या मुकुटरावांपेक्षां राज्यकारभार करण्यांत अधिक चतुर आहेत, अशी लोकांची समजूत असल्यामुळें कलह चालू झाला; व ग्वाल्हेरच्या पुष्कळ मराठे सरदारांस त्यांनींच राज्यकारभार करावा हे पसंत वाटूं लागलें. न्यायाकरितां ह्मणा, अथवा राजधोरणाच्या कांहीं विशिष्ट हेतूकरितां ह्मणा, परंतु ब्रिटिश सरकारानें बायजाबाईसाहेबांच्या विरुद्ध पक्ष स्वीकारिला; आणि त्यांनी त्यांस ग्वाल्हेर संस्थानच्या हद्दीबाहेर दूर ठिकाणी राहावे असा हुकूम फर्माविला. इ. स. १८४३ मध्ये मुकुटराव शिंदे मृत्यु पावलें, व ग्वाल्हेर संस्थानावर ब्रिटिश सरकारचें वर्चस्व अधिक स्थापित झाले. तेव्हां त्यांनी कैलासवासी महाराजांच्या घराण्यांपैकीं एक नवीन मुलगा पसंत करून त्यास शिंद्यांच्या गादीवर बसविलें. ह्या नवीन शिंदे सरकाराजवळ ह्या वृद्ध महाराणी बंडाचा