पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/166

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२

प्रादुर्भाव होईपर्यंत राहिल्या होत्या, असें दिसून येते. ह्या सन्मान्य बाईसाहेबांच्या विरुद्ध चकार शब्द काढण्यास मुळींच जागा नव्हती; परंतु ज्या वेळीं बंड उद्भवलें, व झांशीची राणी, अयोध्येची बेगम ह्यांच्यासारख्या कर्तृत्वशाली स्त्रिया इंग्रजांच्या विरुद्ध पक्षास मिळाल्या, व बायजाबाईसाहेब ह्याही त्यांच्याप्रमाणें कर्तृत्वशाली आहेत हें जेव्हां इंग्रज मुत्सद्यांच्या लक्ष्यांत आले, तेव्हां त्यांच्या हालचालीवर नजर ठेवणें त्यांस अत्यंत अवश्य वाटूं लागलें. त्यांतूनही, कांहीं वर्षांपूर्वी, ग्वाल्हेर संस्थानांतील इंग्रजांच्या राजकीय वर्तनाविरुद्ध तक्रार करण्यास बायजाबाईसाहेबांस कांहीं सबळ कारण झालें असल्यामुळें, त्यांच्यावर सक्त नजर ठेवणें अधिक जरूर झालें. परंतु कितीही सूक्ष्म दृष्टीनें निरीक्षण केलें, तरी बायजाबाईसाहेबांचा बंडवाल्यांशी संबंध होता, असा संशय घेण्यासारखी एकही गोष्ट त्यांच्या वर्तनांत आढळून आली नाहीं.”

 ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेबांसंबंधानें युरोपियन लोकांस जी शंका वाटत होती, ती त्यांच्या निर्मल वर्तनानें अगदीं वृथा ठरली; एवढेंच नव्हे, तर त्यांच्याकडून इंग्रज लोकांस व खुद्द महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस अनपेक्षित परंतु अप्रतिम असें साहाय्य मिळालें.

 बायजाबाईसाहेब ह्यांच्या शहाणपणाचा व इभ्रतीचा लौकिक महाराष्ट्रांत व उत्तर हिंदुस्थानांत सर्वत्र पसरलेला असल्यामुळें, ह्या बंडाच्या प्रसंगी त्यांचे नांव पुढें करून, आपला पक्ष लोकप्रिय करण्याचा प्रयत्न बंडवाल्यांचे पुढारी रावसाहेब पेशवे, तात्या टोपेप्रभृति पुरुषांनी केला होता. इतकेंच नव्हे,तर बायजाबाईसाहेबांस अनुकूल करून घेण्याकरितां, त्यांनी आपला वकील रामचंद्रशास्त्री हा त्यांच्याकडे पाठविला होता. बायजाबाईसाहेब अनुकूल झाल्या, तर त्यांचे अपार द्रव्यभांडार प्राप्त करून घेण्याची, व त्यांच्या सत्कीर्तीचा व वजनाचा लोकचित्ताकर्षणाचे कामीं विद्युल्लतेप्रमाणें उपयोग करण्याची, बंडवाल्यांस फार फार आशा होती. परंतु बायजाबाईसाहेब ह्यांनीं, ह्या प्रसंगी आपल्या मनाची लोकोत्तर निश्चलता व्यक्त