पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/177

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५३

हिंदुस्थानचे एजंट यांजकडे वकील रवाना केले. आजी व नातू यांचे हें वास्तविक प्रेम पाहून फार संतोष वाटतो."

 ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेब ह्यांच्या अस्वस्थतेचें वर्तमान सर्वत्र प्रसिद्ध होतांच, त्यांचा समाचार घेण्याकरिता त्यांच्या परिचयाचे व त्यांच्याविषयीं पूज्यबुद्धि बाळगणारे अनेक लहानमोठे लोक ग्वाल्हेरीस आले. इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर ह्यांची बायजाबाईसाहेबांविषयीं फार पूज्यबुद्धि असल्यामुळें, त्यांनी त्यांच्या अस्वस्थेतेचें वृत्त ऐकतांच, आपले बंधु काशीराव दादा ह्यांस मुद्दाम ग्वाल्हेरीस बाईसाहेबांच्या समाचाराकरितां पाठविलें. त्याचप्रमाणें ग्वाल्हेर येथील रेसिडेंट व इतर युरोपियन लोक बाईसाहेबांच्या समाचाराकरितां येऊं लागले. ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेबांविषयीं जिकडेतिकडे सहानुभूति व्यक्त होऊन, त्यांच्या प्रकृतींस आराम पडावा अशी इच्छा सर्वत्र दिसूं लागली. त्या इच्छाप्रभावानें ह्मणा, किंवा औषधिगुणामुळे ह्मणा, परंतु बाईसाहेबांस मध्यंतरीं आठ पंधरा दिवस चांगला आराम पडला. हें पाहून महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस व अखिल नागरिक जनांस अत्यंत आनंद झाला. त्याच संधीस शिंदे सरकारास पुत्ररत्न प्राप्त होऊन तो आनंद द्विगुणित झाला. त्यामुळें महाराजांनीं गंगा दशहाराचा उत्सव फार थाटानें केला; व मुद्दाम ब्रह्मवर्तास जाऊन तेथें ब्राह्मणभोजनें व सुवर्णदानें केली. ह्याप्रमाणे मध्यंतरीं कांहीं दिवस बाईसाहेबांबद्दलं पुनः आशा उत्पन्न झाली. परंतु ती आशा अगदीं अल्पकालिक होऊन कविकुलगुरु कालिदास ह्यांच्या उक्तीप्रमाणें 'मरणं प्रकृतिः शरीरिणाम्' ह्मणजे जन्मास आलेला प्राणि हा हें नाशवंत जग सोडून जावयाचाच, ह्या नियमाप्रमाणें, बायजाबाईसाहेब ह्यांच्या निधनकालाचा प्रसंग लयकरच प्राप्त झाला. ता. २७ जून इ. स. १८६३ रोजीं, ही ग्वाल्हेरच्या इतिहासांत एकसारखी गाजत असलेली राजकारस्थानी व शहाणी