पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/178

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४

स्त्री हा नश्वर देह सोडून कैलासपदीं गेली. ह्या दिवशीं हिंदुलोकांचा अत्यंत पवित्र व पुण्यकर असा महाएकादशीचा (ह्मणजे आषाढ शुद्ध एकादशी शके १७८६ हा) दिवस होता. त्या दिवशीं अत्यंत समाधानानें ही राजस्त्री मृत्यु पावली. त्यामुळें सर्व प्रजाजन दुःखाने फार हळहळले. त्यांच्या मृत्यूबद्दल दुःखप्रदर्शनार्थ ग्वाल्हेर येथील झांशीबाजार तीन दिवस बंद ठेवण्यात आला होता.

 महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांच्या मृत्यूनें महाराज जयाजीराव ह्यांस फार दुःख झाले. त्यांनी आपल्या घराण्याच्या व ह्या राजस्त्रीच्या मोठेपणास साजेल अशा रीतीनें त्यांचा अंत्यविधि केला. महाराजांनी बाईसाहेबांच्या इच्छेप्रमाणें बहुत दानधर्म केला, व त्यांच्या उत्तरकार्याचे दिवशीं हिंदुस्थानांतील सर्व क्षेत्रांमध्ये एक लक्ष ब्राह्मणभोजन घातलें. त्याचें स्मरण क्षेत्रोक्षेत्रीं अद्यापि जागृत आहे. ह्याप्रमाणें ह्या स्त्रीच्या पुण्याईनें तिचा शेवट उत्तम प्रकारचा झाला. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनी बायजाबाईसाहेबांची ग्वाल्हेर येथे छत्री बांधिली असून, तत्प्रीत्यर्थ कांहीं कायमचें उत्पन्नही करून दिले आहे. ही छत्री कै. दौलतराव शिंदे ह्यांचे छत्रीजवळ असून, तेथें बायजाबाईसाहेबांची उत्तम शिल्पकाराकडून तयार केलेली संगमरवरी दगडाची मूर्ति स्थापन केली आहे. तिची पूजाअर्चा व वार्षिक उत्सव अद्यापि चालत आहे. ह्याशिवाय पंढरपूर येथेंही द्वारकाधीशाच्या देवालयामध्यें बायजाबाईसाहेबांची एक मूर्ति असून तिच्याही पूजानैवेद्य वगैरे नित्यखर्चाबद्दल शिंदे सरकाराकडून स्वतंत्र उत्पन्न व वर्षासन अद्यापि चालत आहे. ह्याप्रमाणें ही स्त्री मृत्युपश्चात् देखील सर्वांच्या पूजेस व वंदनास पात्र झाली आहे.

 महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांची कीर्ति हिंदुस्थानामध्यें सर्वत्र पसरलेली असून, जुन्या व वृद्ध लोकांच्या तोंडून त्यांचे वर्णन ऐकू येतें. परंतु त्यांच्या खऱ्या चरित्राच्या किंवा इतिहासग्रंथाच्या अभावामुळें त्यांचें