पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/180

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६

ह्या उक्तीप्रमाणे आपल्या पश्चात् आपली कीर्ति हिंदुस्थानांत दुमदुमत ठेविली आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. असे स्त्रीरत्न ज्या शिंदे कुलामध्ये प्रसिद्ध झालें, त्या कुलास व एकंदर राष्ट्रास ते ललामभूत होय, ह्यांत शंका नाहीं.

 बायजाबाईसाहेबांनी ज्या ग्वाल्हेर संस्थानचा राज्यकारभार चालविला, त्याची सांप्रत सर्वप्रकारें सुधारणा होऊन तें चांगल्या भरभराटीच्या स्थितीप्रत पोहोचलें आहे. त्याचें क्षेत्रफळ २९,०४६ चौरस मैल असून त्याची लोकसंख्या ३०,३०,५४३ आहे. ह्या संस्थानचे अधिपति श्रीमंत महाराज अलिजाबहादुर माधवरावसाहेब शिंदे हे आहेत. हे बायजाबाईसाहेबांचे पणतू होत. ह्यांजवर ब्रिटिश सरकारची पूर्ण मेहेरबानी असून, त्यांस त्याजकडून के. सी. एस्. आय्. ही बहुमानाची पदवी मिळालेली आहे. ह्यांच्याजवळ ५५०४ स्वार, ११०४० पायदळ व ४८ तोफा इतकें सैन्य आहे. ह्यांनीं दक्षिण आफ्रिकेंतील व चीन देशांतील युद्धप्रसंगीं द्रव्यरूपानें व सैन्यरूपानें सार्वभौम सरकारास चांगले साहाय्य केलें आहे. ह्यांच्या हातून उत्तमप्रकारें राज्यकारभार चालून प्रजा सदैव सुखानंदांत राहो, व शिंदे घराण्याचा लौकिक व उत्कर्ष शुक्लेंदुवत् वर्धमान होवो, अशी परमेश्वराजवळ अनन्यभावें प्रार्थना करून हा चरित्रग्रंथ संपवितों.


बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 180 crop)