पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करितां इनाम देण्यात आला असून, अद्यापि तो छत्रीच्या उत्सवाकडे चालत आहे. राणोजीस मैनाबाई नामक लग्नाच्या बायकोपासून जयाजी ऊर्फ जयाप्पा, दत्ताजी, व जोतिबा ऊर्फ जोत्याजी असे तीन पुत्र, व चिमाबाई नामक राखेपासून महादजी व तुकोजी असे दोन पुत्र, मिळून एकंदर पांच पुत्र होते. हे एकापेक्षां एक पराक्रमी व कर्तृत्ववान् निपजून, त्यांनी आपल्या देशभूमीची अप्रतिम सेवा बजाविली; व इतिहासांत आपली कीर्ति अजरामर करून ठेविली.

 राणोजी मृत्यु पावल्यानंतर त्याची जहागीर व सरदारीची वस्त्रें जयाजीस मिळालीं. हा जयाजी मराठ्यांच्या इतिहासांत जयाप्पा ह्या नांवानें फार प्रसिद्ध आहे. ह्यानें आपल्या वडिलांप्रमाणे शौर्याचीं अनेक कामें करून, मराठ्यांची सत्ता उत्तरेकडे वृद्धिंगत केली. ह्या पुरुषाच्या पराक्रमकथा फार आल्हाददायक असून, त्यांत मराठ्यांचें शौर्य, मराठ्यांचा अभिमान, मराठ्यांची कर्तृत्वशक्ति आणि मराठ्यांचें ओज इत्यादि प्रशंसनीय गुण ओतप्रोत भरले आहेत. ह्यानें ज्या वेळीं रोहिल्यांचा पराभव करून अयोध्येचा नबाब सफदरजंग ह्यास वजिरी प्राप्त करून दिली, व मराठ्यांच्या यशोवैभवाचा झेंडा रोहिलखंडांत नेऊन उभारला; त्या वेळीं बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी त्याचा जो गौरव केला आहे, तो केवळ अपूर्व आहे. "शाबास तुमच्या हिंमतीची व दिलेरी रुस्तुमीची; व शाबास लोकांची ! आमच्या दक्षिणच्या फौजांनीं गंगायमुनापार होऊन, रोहिले पठाणांशीं युद्ध करून, आपण फत्ते पावावें, हें कर्म लहान सामान्य न झालें. तुह्मीं एकनिष्ठ, कृतकर्मे सेवक, या दौलतीचे स्तंभ आहां !! जें चित्तावर धरितां, ते घडून येते !!" इत्यादि पेशव्यांचीं गौरववचनें वाचून, कोणा सहृदय वीराच्या नेत्रांतून आनंदाश्रू येणार नाहींत बरें ? जयाप्पा शिंदे ह्यांनी लढवय्या रोहिले लोकांशीं घनघोर युद्धें केलीं, व महापराक्रमी रणझुंजार रजपूत वीरांना