पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केवळ अपूर्व आहेत. त्या वेळी प्रत्यक्ष वीररसाने त्यांच्या अंगीं मूर्तिमंत संचार केला होता की काय, असा भास होतो. दत्ताजी शिंदे रणांत घायाळ होऊन पडले, त्या वेळीं रोहिल्यांचा सरदार कुतुबशाह ह्यानें दुष्टबुद्धीने त्यांस विचारिलें कीं, “पटेल, हमारे साथ तुम् और लढेंगे ?" त्या वेळीं ह्या मर्द पुरुषाने उत्तर दिलें कीं "निशा अकताल्ला ! बचेंगे तो और बी लढेंगे." अर्थात् अशा महारथी योद्ध्याचा रणोत्साह पाहून प्रत्यक्ष रणदेवतेस देखील कौतुक वाटेल, मग इतरांची ती गोष्ट काय ? दत्ताजी शिंदे यांचा कुतुबशाहानें शिरच्छेद करून त्यांचे शीर अहमदशाह आबदाल्लीकडे नजर पाठविलें. तें शीर परत मिळविण्यास मराठ्यांस, अयोध्येचा नबाब सुजाउद्दौला ह्यास मध्यस्ती घालावे लागलें; व त्याकरितां तीन लक्ष रुपये बादशाहास खंडणी द्यावी लागली!! नुसत्या गतासु कलेवराच्या शिरास जर तीन लक्ष रुपये किंमत द्यावी लागली, तर प्रत्यक्ष त्या वीराची किंमत काय असेल ? अर्थात् असा अमूल्य मोहरा हरपल्यामुळें महाराष्ट्राचें अत्यंत नुकसान झालें ह्यांत शंका नाहीं.

 दत्ताजी शिंदे ह्यांचा अंत झाल्यानंतर मराठ्यांचे व गिलच्यांचे शेवटचे तुमुल युद्ध झालें. त्यांत जनकोजी शिंदे ह्यांनी भारतीय युद्धांतील धृष्टद्युम्नाप्रमाणे पराक्रम गाजविला. त्यांस तोफेचा गोळा व भाल्याची जखम लागून ते रणांगणीं पडले; व शत्रूंनी त्यांचा विद्ध देह पाडाव केला. त्यांस जिवंत सोडविण्याकरितां सुजाउद्दौल्याचा वकील पंडित काशीराज ह्याने फार खटपट केली. परंतु ती निष्फल होऊन अखेर त्यांचा पाषाणहृदयी व कपटपटु नजीबखान रोहिल्यानें निर्दयपणाने वध केला.

 ह्याप्रमाणें राणोजी शिंद्याचे वीरपुत्र एकामागून एक धारातीर्थीं पतन पावले. राणोजीस जयाजी व दत्ताजी ह्यांशिवाय जोतिबा ह्या