पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/33

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०

नांवाचा तिसरा पुत्र होता. तोही बुंदेलखंडांतील वोढसेप्रांतीं बरवासागर []गांवीं स्वामिकार्यावर लढत असतां मृत्यु पावला. ह्याप्रमाणें राणोजीच्या औरस संततीपैकीं तिन्हीं पुत्रांचा निकाल लागला. त्याशिवाय त्यास तुकोजी व महादजी असे दोन राखेच्या पोटचे पुत्र होते. ते दोन्ही पानिपतच्या युद्धामध्ये हजर होते. त्यांपैकीं तुकोजी त्याच युद्धांत मृत्यु पावला. बाकी फक्त महादजी राहिला. तो मोठ्या शर्थीनें जीव बचावून परत आला. त्यानें पुढें आपल्या तरवारबहादुरीनें पानिपतच्या युद्धांत गत झालेली मराठ्यांची अब्रू परत मिळविली; व आपल्या शौर्याचा कीर्तिध्वज सर्व हिंदुस्थानभर फडकत ठेविला.

 महादजी ऊर्फ पाटीलबावा ह्यांचें चरित्र फार महत्त्वाचें आहे. पानिपतच्या मोहिमेनंतर मराठ्यांची जेवढीं ह्मणून महत्त्वाचीं राजकारणें झाली, त्या सर्वांमधे पाटीलबावा ह्यांचे नांव प्रमुखत्वेंकरून चमकत आहे. किंबहुना, अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत मराठ्यांचा तेजोरवि जो पुनःप्रकाशित झाला, तो केवळ ह्या लोकोत्तर पुरुषाच्या परिश्रमाचेंच फल होय असे ह्मटल्यास फारशी हरकत येणार नाहीं. पुणेंदरबारचीं कारस्थानें ज्याप्रमाणें नाना फडणविसांनीं चालविलीं, त्याप्रमाणें पाटीलबाबांनी उत्तर हिंदुस्थानांतील सर्व मनसबे युक्तिप्रयुक्तीने सिद्धीस नेले. त्यांचें लष्करी धोरण शिवाजी महाराजांच्या तोडीचे असून, पाश्चिमात्य राष्ट्रांची सुधारलेली सैन्यरचना व युद्धपद्धति ह्यांचे महत्त्व त्यांच्या लक्ष्यांत चांगले आल्यामुळें, त्यांनीं, डी बॉयन, पेरन वगैरे युद्धकलाकुशल फ्रेंच लोक आपल्या पदरीं ठेवून, मराठी सैन्याची सुधा


  1.  बरवासागर हा गांव पेशव्यांनी जोतिबाच्या शौर्याबद्दल शिंद्यांस छ २६ मोहरम सलास खमसैन ( ता. ३ दिसेंबर इ. स. १७५२) रोजी इनाम दिला होता. त्यावरून जोतिबाचा मुत्यु त्याच्या अगोदर थोडे दिवस झाला असावा हे उघड आहे.