पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/43

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०

 परशुरामभाऊ पटवर्धन हे त्या वेळीं दक्षिण महाराष्ट्रामध्यें पेशव्यांचे बलाढ्य सरदार ह्मणून प्रसिद्ध होते; व त्यांच्या पदरीं सैन्याचा जमावही पोक्त होता. त्यामुळें सखारामराव घाटग्यासारख्या मर्द शिपायास त्यांच्या पथकामध्ये शिलेदारीचें काम स्वीकारून आपली कर्तृत्वशक्ति दाखविण्यास चांगली संधि मिळाली. परशुरामभाऊ पटवर्धन हे स्वतः युद्धकलानिपुण व पराक्रमपटु असल्यामुळे 'गुणी गुणं वेत्ति' ह्या न्यायानें सखारामराव घाटगे ह्यांच्या शिपाईगिरीची त्यांनी तेव्हांच परीक्षा पाहिली; व त्यांच्या अंगी हिंमत, धाडस, शौर्य इत्यादि वीरपुरुषाचे गुण चांगले वसत आहेत, असें त्यांच्या लक्ष्यांत आले. तेव्हांपासून त्यांची सखारामरावावर हळू हळू मेहेरबानी जडत चालली. परशुरामभाऊंसारख्या प्रबल व वजनदार सरदाराचा चांगला आश्रय मिळाल्यामुळें सखारामराव घाटगे ह्यांस आपला भाग्योदय करून घेण्याचा अनायासें योग प्राप्त झाला.
 सखारामराव ह्यांचे परशुरामभाऊ पटवर्धनांबरोबर पुण्यास वारंवार जाणें येणें होऊं लागलें. त्या योगानें पुणें दरबारचे प्रख्यात मुत्सद्दी नाना फडनवीस ह्यांचा व त्यांचा चांगला परिचय झाला. सखारामराव घाटगे हे हुशार, धीट व कारस्थानी गृहस्थ असल्यामुळें नाना फडनविसांची त्यांच्यावर मर्जी बसली; व त्यांनी परशुरामभाऊंकडून त्यांना मागून घेऊन, खुद्द पेशव्यांचे लष्करांत त्यांस खास पथकाची शिलेदारी दिली. अशा रीतीनें सखारामराव ह्यांचा पुणें दरबारात प्रवेश झाला.
 सखारामराव घाटगे पुण्यास आल्यानंतर लवकरच सवाई माधवराव पेशवे हे मृत्यु पावले; व पुणें दरबारांत गोंधळ होऊन, पेशवाईच्या गादीविषयीं तंटेबखेडे सुरू झाले. त्या प्रसंगी महादजी शिंदे ह्यांचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे, नाना फडनवीस आणि परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांची अनेक कारस्थानें होऊन, अखेर बाजीराव पेशवे ह्यांस पेशवाईची गादी मिळाली. ह्या सर्व राजकारणांत सखारामराव घाटगे हे अंशतः सूत्रचालक होते, असे ह्मणण्यास हरकत नाहीं.