पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/48

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग ३ रा.

,

________________
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.


 वाई माधवराव पेशवे हे इ. स. १७९५ सालीं मृत्यु पावल्यानंतर पुणें येथील पेशव्यांच्या गादीविषयीं तंटा उत्पन्न झाला. नाना फडनवीस, तुकोजी होळकर, बाळोबा तात्या, परशुराम भाऊ पटवर्धन वगैरे मंडळीनें राघोबादादांचे पुत्र बाजीराव ह्यांस गादी मिळूं न देण्याचा निश्चय करून, सातारच्या छत्रपतीकडून असे आज्ञापत्र


 १ हें अस्सल आज्ञापत्र येणेंप्रमाणें आहे:-"स्वस्तिश्री राज्याभिषेक शके १२१ राक्षसनाम संवत्सरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी यांणीं राजमान्य राजश्री बाळाजी जनार्दन यांस आज्ञा केली ऐसीजेः- माधवराव पंडित प्रधान यांस अकालीं कैलासवास प्राप्त झाला; पोटीं पुत्र नाहीं; पेशवाईचे पदाचा कारभार चालोन बंदोबस्त जाहला पाहिजे. त्यास त्यांचे वंशांतील रघुनाथ बाजीराव यांचे पुत्र आहेत, त्यांतील पंतप्रधान यांची स्त्री यशोदाबाई यांस पुत्र देऊन पदाधिकारी करावें; तर पेशजी रघुनाथराव यांजपासोन अनन्वित गोष्ट घडली. त्या वेळचे मुत्सद्दी व सरदार यांचा पूर्ण द्वेष स्मरोन राज्यांत बखेडा पडेल व शास्त्रविरुध पडतें. व पेशजी कै. बाळाजी बाजीराव यांणीं स्वामिसेवा एकनिष्ठपणें केली. एतदर्थीं त्यांचे वंशाचे नांव पुढें चालावें याकरितां पंतप्रधान यांचे स्त्रीस दत्त पुत्र देऊन, पदास अधिकारी करून, कारभाराचा बंदोबस्त जाहला पाहिजे. हें जाणून हें आज्ञापत्र तुह्मांस सादर केले असे. तरी त्यांचे गोत्रजांतील दत्तपुत्र यशोदाबाई यांस देऊन, कारभारचा बंदोबस्त तुह्मीं करून, हुजूर विनंति करणे, जाणिजे. छ. २९. जमादिलोवल सु॥ तिसैन मया व आलफ " ( मोर्तब ).