पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/53

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०

प्राप्त होऊन जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला. ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेब ह्या घाटग्यांच्या कुलांतून शिंद्यांच्या कुलांत गेल्या; व इतिहासांत ‘बायजाबाईसाहेब शिंदे' ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या.
 बायजाबाईसाहेबांचे लग्न झाल्यानंतर पुण्याच्या दरबारांत जीं राजकारणें व जे घोंटाळे झाले, त्यांचा संबंध ह्या चरित्राशीं नसल्यामुळें त्यांचे विवरण येथे करितां येत नाहीं. तथापि, ह्या लग्नामुळे दौलतराव शिंद्यांस मनस्वी कर्ज होऊन, त्यांना पुढें, बाजीरावांनीं देऊ केलेले दोन कोटी रुपये मागावे लागले; व ते वसूल करण्याकरितां सर्जेराव घाटग्यांस पुण्याची लूट करावी लागली. त्या लुटीमध्ये लोकांचा फार भयंकर रीतीने छल झाला, हें येथे नमूद करणे अवश्य आहे. ह्या छलानें त्रस्त होऊन, अमृतराव पेशवे ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांस कैद करण्याचा यत्न चालविला. बाजीराव पेशवे ह्यांनी एका भेटीमध्ये दौलतरावांस असे विचारिलें कीं, “तुह्मी माझे धनी आहांत कां नौकर आहात ? माझी प्रतिष्ठा ठेवायची असेल, तर तुह्मीं हिंदुस्थानांत निघून जावें. सर्जेरावाचा छल आता माझ्याने पाहवत नाहीं !”
 पुण्यास बेबंदशाही झाल्यामुळे दौलतरावांचे तेथें वजन पडेनासें झालें. ह्याच सुमारास महादजी शिंद्यांच्या बायका दौलतरावांच्या विरुद्ध होऊन, त्यांनी शिंद्यांच्या प्रांतांत दंगा चालविला; व तिकडे उत्तर हिंदुस्थानांतही बरीच गडबड उडाली. तेव्हां दौलतराव ह्यांस आपल्या प्रांताचा बंदोबस्त करण्याकरितां तिकडे जाणे भाग पडलें.
 दौलतराव शिंदे उत्तर हिंदुस्थानांत गेले, त्या वेळी त्यांच्या सैन्याची पूर्वींची शिस्त सर्व बिघडली होती; व सर्व लष्करी सरदारांमध्ये परस्परांचा मत्सर व द्वेष हे दुष्ट ग्रह उत्पन्न झाले होते. ज्या वेळीं डी बॉयन ह्या फ्रेंच सरदारानें शिंद्यांच्या नौकरीचा राजीनामा दिला, त्या वेळीं फक्त त्याच्या एकट्याच्या हाताखाली २४००० पायदळ, ३०००