पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६

दौलतराव यांची कंपनी सरकाराशीं दोस्ती झाली. हे सर्व प्रकार मनांत आणून, कंपनीसरकार सालीना च्यार लक्ष रुपये खुद्द अलिज्याबहादर दौलतराव ह्यांस पेनशन देण्याचें कबूल करीत आहेत. ही रक्कम रेसिडेंट मार्फत तिमाही हप्तेबंदीनें महाराज अलिज्याबहादरांस आदा होत जाईल. ह्याशिवाय, महाराज अलिज्याबहादर दौलतराव ह्यांच्या राणी बायजाबाईसाहेब ह्यांस, बाळाबाईप्रमाणें कंपनीसरकार आपले हिंदुस्थानांतील राज्यांत दोन लक्ष रुपयांची जहागीर व महाराजांची कन्या चिमणाबाई हिजला एक लक्षाची जहागीर एकूण तीन लक्षांची जहागीर देण्याचे कबूल करीत आहेत.”
 ह्या कलमाप्रमाणें बायजाबाईसाहेब व त्यांची कन्या चिमाबाईसाहेब ह्यांस कंपनीसरकारांतून स्वतंत्र जहागीर देण्यात आली. त्यावरून बायजाबाईसाहेब ह्यांचे माहात्म्य इंग्रज मुत्सद्दयांस पूर्ण विदित झालें असावें असें स्पष्ट दिसून येतें. हा तह झाल्यानंतर दौलतराव शिंदे ह्यांनी उघडपणानें इंग्रजांच्या विरुद्ध कधींही शस्त्र उचलले नाही. त्यांनी १८०५ नंतर उत्तर हिंदुस्थानांत ग्वाल्हेर येथें आपल्या सैन्याचा तळ दिला होता. तेथेंच इ. स. १८१० सालीं "लष्कर" गांव वसलें. हीच पुढें शिंद्यांची राजधानी झाली. दौलतराव शिंदे ह्यांचे पदरीं सैन्य पुष्कळ असून जानबत्तीस, सवाई शिकंदर, पेरन वगैरे फ्रेंच सेनापति होते. त्याचप्रमाणे बापू शिंदे, देवबा काळे, जगु बापू, अंबाजी इंगळे वगैरे नामांकित मराठे सरदार होते. सर्जेराव घाटगे हे इंग्रजांच्या विरुद्ध असल्यामुळें १८०५ सालच्या तहाप्रमाणें त्यांस दरबारांतील मंत्रिमंडळांतून कमी केलें होतें. परंतु पुनः त्यांनी दौलतरावांची मर्जी संपादन करून शिंद्यांच्या दरबारांत वर्चस्व प्राप्त करून घेतलें होतें. त्यांच्या अंगीं धारिष्ट व शिपाईगिरी हे दोन चांगले गुण होते. परंतु त्यांच्या इतर दुर्गुणांमुळे ते सर्वांस अप्रिय झाले होते. त्यांनी दौलतरावांच्या दरबारांत अरेरावी-