पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/60

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७

पणाचें वर्तन केल्यामुळें त्यांचा आनंदराव नामक सरदारानें व मानाजी फाकडे ह्यांच्या मुलाने ता. २७ जुलै इ. स. १८०९ सालीं वध केला.
 शिंद्यांचें सैन्य अतिशय असून प्रांताचें उत्पन्न व्यवस्थित रीतीनें येत नसल्यामुळे त्याचा खर्च निभेनासा झाला. त्यामुळे दौलतरावांस आपला पुष्कळ प्रांत सैन्याच्या खर्चाकरितां कर्जदारांकडे गहाण ठेवावा लागला. एवढेंच नव्हे, तर इंग्रजसरकाराकडून मिळणारें पेनशन व जहागिरीचें उत्पन्न सावकारांस लावून द्यावे लागलें. त्यामुळें लष्करी अंमलदार शिरजोर झाले, व त्यांनी मन मानेल त्याप्रमाणे मनस्वी वर्तणूक केली. त्यामुळें राज्यांतील शिस्त व बंदोबस्त कमी झाला. पुढें इ. स. १८१७ सालीं पेंढारी लोकांची व इंग्रजांची लढाई झाली. त्या वेळीं मेजर मालकम ह्यांनीं, पुनः दौलतरावांबरोबर ता. ५ नोवेंबर १८१७ रोजीं नवा तह करून, शिंद्यांचे सैन्य इंग्रज अधिका-यांच्या देखरेखीखाली ठेविलें; व रजपूत संस्थानिकांवरचें शिंद्यांचे स्वामित्व काढून घेतलें. हा तह झाल्यानंतर होळकरांचा दंगा व बाजीराव पेशव्यांची धामधूम झाली. त्या प्रसंगी शिंद्यांच्या दरबारांतल्या कांहीं लोकांनी थोडी गडबड केली; परंतु खुद्द दौलतराव ह्यांनी इंग्रजसरकाराशीं बिघाड केला नाही. त्यामुळें बाजीराव पेशवे ह्यांचा त्यांजवर रोष झाला, व त्यांनी त्यांस रागाने असे पत्र पाठविले, कीं, "तुमचे तीर्थरूपांनीं स्वामिसेवा एकनिष्ठपणें करून, दिल्लीची वजिरी संपादन केली व ते जगविख्यात होऊन गेले. त्यांचे चिरंजीव तुह्मी असून, कंपनीसरकाराशीं स्नेह करून, आह्मांशीं कृतघ्न झालां. हें करणें तुह्मांस उचित नाहीं. ह्यापेक्षां तुह्मीं बांगड्या भरल्या असत्या, तर बरें झालें असतें. आह्मांवर तूर्त प्रसंग गुदरला आहेच. आतां तुमचे ऐश्वर्य कायम राहणे कठीण दिसते!" बाजीरावांचे हें पत्र वाचून दौलतराव शिंदे ह्यांनीं विस्मय प्रदर्शित केला. परंतु त्यांनी त्या पत्रानें प्रोत्साहित