पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/64

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१

राजकारणास अयोग्य, त्यांची योग्यता फक्त गोषांत बसण्यापुरती, असला अनुदार विचार बायजाबाईच्या संगतीमुळें त्यांच्या अंतःकरणांतून पार नाहींसा झाला होता. डा. होप नामक शिंद्यांच्या दरबारांतल्या एका भिषग्वर्यांनी असे लिहिले आहे कीं, "दौलतराव शिंद्यांचा असा अभिमान होता कीं, आपण कोणतीही महत्त्वाची गोष्ट आपल्या पत्नीच्या संमतीवांचून केली नाही. आणि पूर्वेकडील देशांतील पुरुष आपल्या स्त्रियांस किती कमी दर्जाने वागवितात हे लक्ष्यांत घेतलें, ह्मणजे हा अभिमान फारच अलौकिक होता, असे ह्मटले पाहिजे." अर्थात् डा. होपसारख्या परदेशीय गृहस्थांस दौलवराव शिंद्यांच्या ज्या अभिमानाचे फार आश्चर्य वाटले, त्या अभिमानानें पुष्कळ संस्थानिकांच्या अंतःकरणांत प्रवेश केला असता, तर बायजाबाईसारख्या किती तरी राजकारणी व चतुर स्त्रिया हिंदुस्थानांत चमकू लागल्या असत्या. जुना काळ व जुना इतिहास ज्या गोष्टी शिकवीत आहे, त्या गोष्टींची हिंदुस्थानच्या सुधारलेल्या वर्तमान स्थितींत उणीव असावी, ही मात्र खेदाची व आश्चर्याची गोष्ट होय. ह्यावरून, दौलतराव शिंद्यांच्या वेळचा धामधुमीचा काळ अधिक बरा असे ह्मणावे लागतें. असो.
 दौलतराव शिंदे ह्यांच्या आजारीपणांत रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी संस्थानाच्या भावी व्यवस्थेबद्दल पुनः एकदा प्रश्न विचारला. त्या वेळी महाराजांनी असे उत्तर दिले की, "जर राजाची बायको शहाणी व समजूतदार असेल, तर त्याच्या पश्चात् त्याचा कारभार करण्यास तीच पात्र होय." त्या वेळीं रोसडेंट साहेबांनी पुनः विचारलें कीं, "परंतु


 १ "His boast was (and a most singular one it is, when we remember the low esteem in which women are held in all eastern countries ), that he never undertook an affair of importance without consulting her.”