पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/67

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४

वर्णन मेजर स्टुअर्ट ह्यांनी हिंदुस्थान सरकारास पाठविलेल्या आपल्या खलित्यांत सविस्तर रीतीनें केलें आहे. तें प्रत्यक्ष अनुभवानें लिहिलें असून करुणरसानें ओतप्रोत भरलें आहे. तेंच येथें सादर करितोंः-

 "काल सकाळी ९ वाजण्याचे सुमारास, महाराजांच्या राजवाड्यांतून एक घोडेस्वार रसिडेन्सीमध्यें मोठ्या त्वरेनें भरधांव घोडा फेंकीत आला. त्यानें हिंदुरावांचा असा निरोप कळविला कीं, "महाराज साहेबांनीं आपणांस भेटण्याची उत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ह्याकरितां, आपण एक क्षणाचाही विलंब न लावितां, ताबडतोब राजवाड्यांत यावे." हा निरोप ऐकतांच, महाराजांचा अंतकाल अगदीं समीप येऊन ठेपला असें वाटून, मी लगेच घोड्यावर बसलों; आणि क्याप्टन डाईक ह्यांस फक्त बरोबर घेऊन तत्काल राजवाड्यांत गेलों. राजवाड्यांत जातांच चिंताक्रांत झालेला हजारों लोकांचा समुदाय माझे दृष्टीस पडला. राजवाड्यांत प्रवेश करितांच निरनिराळ्या दालनांमध्ये सरदार, मानकरी व इतर सभ्यलोक जमा झालेले दृष्टीस पडले. हिंदुरावांची व माझी भेट होतांच, महाराजसाहेबांची प्रकृति कशी काय आहे असा मीं प्रश्न केला. हिंदुरावांनीं "महाराज फार अत्यावस्थ आहेत; आपण लवकर भेटावें." असें उत्तर दिलें. माझें व हिंदुरावांचें हें भाषण होत आहे, तोंच महाराजांच्या अंतःपुरांत, मी आल्याची वर्दी पोहोंचून, महाराजांनी मला आंत येण्याबद्दल पाचारण केलें. तेव्हां मी लगेंच महाराज ज्या खोलीमध्यें होते तेथें गेलों. मजबरोबर हिंदुराव, रावजी खाजगीवाले, आत्माराम पंडित व आणखी एक दोन गृहस्थ होते. क्याप्टन डाईक हेही मजबरोबर आंत आले. महाराज पलंगावर लोडाला टेंकून बसले होते, किंवा पडले होते, ह्मटलें तरी चालेल. त्यांच्या सभोंवतीं पुष्कळ दासी व नौकर लोक होते. त्यांच्या पलीकडे पडद्यांमध्ये बायजाबाई, रखमाबाई आणि बाळाबाई ह्या होत्या. महारा-