पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/70

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७

स्तव मला बाईसाहेबांजवळ नेण्यांत आले. त्या वेळी त्यांची व माझी भेट फक्त एका पातळ पडद्याच्या अंतराने झाली.
 "त्या प्रसंगी मी जें काय भाषण केलें, तें येथें सविस्तर देण्याची आवश्यकता नाहीं. ह्या भाषणाचे शेवटीं, महाराजांनी मला मरतेवेळीं जें सांगितलें आहे, त्याप्रमाणें सर्व राज्याचा अधिकार मीं धारण केला आहे, व आतां तुह्मीं आपल्या निवासस्थानी जावें अशी माझी इच्छा आहे, असें मी सांगितले. परंतु त्याप्रमाणे घडले नाही. शेवटीं बायजाबाई ह्यांस राजवाड्यांतील सर्व स्त्रियांना हातीं धरून अंतःपुरांत न्यावें लागलें.
 "पुढे कांहीं वेळानें रेसिडेंट ह्या नात्यानें मजकडे एक सात कलमांचा खलिता पाठविण्यांत आला. हें महाराजांचे शेवटचें मृत्युपत्र ह्मणून आलें होतें. परंतु त्यावर महाराजांची सही नव्हती. ह्यांतील मुख्य मुद्यांचा आशयः- महाराजांचा हेतु दत्तकपुत्र घ्यावा; हिंदुराव ह्यांनी सर्व राज्याचे व्यवस्थापक (Superintendent ) व्हावें; औरस पुत्र झाल्यास तो गादीचा अधिकारी व्हावा; व न झाल्यास दत्तक पुत्रानें, महाराज व बायजाबाई हे जोंपर्यंत हयात आहेत तोंपर्यंत त्यांच्या आज्ञेंत चालावें; इत्यादि होता. आणि शेवटीं, ह्या सर्व गोष्टी सिद्धीस नेण्यास ब्रिटिश सरकाराने साहाय्य करावे, अशी विनंति केली होती.
 महाराजांच्या अंत्यविधीचा देखावा फारच हृदयद्रावक व शोककारक होता. महाराजांचें शव पालखीमध्यें घालून त्यावर उंची पोषाख व रत्नांचे व मोत्यांचे अलंकार घातले होते. त्यांचे तोंड मोकळें ठेवलें असून जीवंत मनुष्याप्रमाणें त्यांस बसविलें होतें. त्यांच्या ह्या शेवटच्या स्वारीचा समारंभ दरबारी थाटाप्रमाणें असून, त्यांच्या पालखीबरोबर हत्ती, घोडे, डंका निशाणें वगैरे सर्व चाललें होतें. लष्करांतील प्रत्येक माणूस त्यांच्या प्रेताबरोबर होता. तात्पर्य, त्यांचे शेवटचें दर्शन घेण्यास फारच गर्दी झाली होती. सर्व प्रजाजन महाराजांच्या मृत्यूमुळें अत्यंत