पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/72

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९

बरोबर अगदीं स्नेहभावाचें होतें, त्याच्या मृत्यूचें वृत्त लिहितांना माझी हृदयवृत्ति द्रवून जाणे साहजिक आहे. तसें न झालें तर मला खरोखर पाषाणहृदयीच व्हावें लागेल. त्याचप्रमाणें, मृत्युसमयीं त्यानें ब्रिटिश सरकारच्या न्यायीपणाबद्दल व औदार्याबद्दल जो अमर्याद विश्वास दाखविला, ती त्याच्या मृत्यूबरोबर घडलेली एक महत्त्वाचीच हृदयद्रावक गोष्ट समजली पाहिजे."
 ह्या खलित्यावरून मेजर स्टुअर्ट हे सुस्वभावी गृहस्थ असून, एतद्देशीय संस्थानिकांविषयीं त्यांच्या मनांत किती आदरबुद्धि वसत होती, हें चांगले दिसून येतें. असो.
 महाराज दौलतराव निवर्तल्यानंतर त्यांचा उत्तरविधि राजकीय थाटानें झाला. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस आपल्या प्रियपतीचें चिरकालिक वियोगदुःख सहन करण्याचा भयंकर प्रसंग प्राप्त झाला. परंतु त्यांनीं, धीर न सोडतां, मोठ्या शांतपणाने ते सहन करून, आपल्या यजमानांच्या आज्ञेप्रमाणे संस्थानची राज्यसूत्रे लवकरच आपल्या हातीं घेतलीं.
 बायजाबाईसाहेबांनी महाराज दौलतराव शिंदे ह्यांच्या दहनस्थानावर एक सुरेख छत्री बांधून त्यांचे ग्वाल्हेर येथें चिरस्मारक करून ठेविलें आहे. ह्या छत्रीच्या खर्चाकरितां त्यांनी सालीना दहा हजार रुपयांची नेमणूक करून दिली आहे. ती अद्यापि चालत असून त्या छत्रीचा प्रतिवार्षिक उत्सव मोठ्या थाटानें होत असतो.
 दौलतराव शिंदे शरीरानें धट्टेकट्टे असून त्यांची उंची ५-५॥ फूट होती. त्यांचा वर्ण काळा असून, चेहरा वाटोळा व नाक किंचित् चपटें होते. तथापि एकंदर चेहरा दिसण्यांत भव्य आणि परोपकारशील असा दिसे. त्यांची वर्तणूक फार आदबीची असून त्यांस आदरसत्कार फार प्रिय असे. त्यांचा पोषाख व एकंदर चालचलणूक पाहून, पुष्कळ