पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/75

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२

मार्फत होत असत. तात्पर्यं, प्रत्येक गोष्टींत त्यांचे सौजन्य दिसून येत असे. इंग्रजी रेसिडेंटाचा ते फार सत्कार ठेवीत असत; व त्यांस क्वचित् प्रसंगी मेजवान्या देत असत.
 दौलतराव हे सर्व हिंदुलोकांप्रमाणें धर्माच्या बाबतींत परधर्मीयांशी फार सौम्यपणानें वागत असत. ते स्वतः कर्मनिष्ठ होते, परंतु मुसलमान साधूंविषयी व त्यांच्या देवस्थानांविषयी त्यांची पूज्य बुद्धि असे. त्यांनी मुसलमानांच्या पिरांचीं व फकिरांचीं वर्षासने चालविली होतीं. ग्वाल्हेर येथील शाह मनसूर ह्याच्या स्थानाबद्दल त्यांची पराकाष्ठेची भक्ति असे. ह्याचें कारण, त्या अवलियानें महादजी शिंदे ह्यांस, "दिल्लीपर्यंत तुला राज्य दिलें आहे" असा वरप्रसाद दिला होता. त्याप्रमाणें पुढें घडून आलें, ह्मणून शिंद्यांच्या घराण्यांत त्या अवलियाविषयीं भक्तिभाव उत्पन्न झाला. तो अद्यापि चालू आहे.
 दौलतराव हे पुढें पुढें उदास झाले होते असें दिसून येतें. त्यांच्याविषयीं एका युरोपियन गृहस्थानें अशी एक गोष्ट लिहिली आहे कीं, "इ. स. १८०७ सालीं एकदा धूमकेतू निघाला. त्या वेळीं दौलतरावांच्या मुत्सद्दयांनीं व ब्राह्मणमंडळींनीं, राजे लोकांस हें अनिष्ट असून, कांहीं फेरफार होणार असें भाकित केलें. त्या वेळीं दौलतराव शिंदे यांनी असें उत्तर दिलें कीं, 'माझें आतां कांहीं अनिष्ट होण्यासारखें राहिलें नसून, माझ्या स्थितीमध्यें झाला, तर कांहीं इष्टच फेरफार होईल!" इ. स. १८०३-४ सालीं जनरल वेलस्ली व लॉर्ड लेक ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांचा पराभव करून सुर्जीअंजनगांवच्या तहामध्ये त्यांचे स्वातंत्र्य हरण केलें, त्या मानहानीस अनुलक्षून हे उत्तर होतें.
 दौलतराव शिंदे ह्यांचा काळ शास्त्रीय शोध व ज्ञानप्रसार ह्यांचा नसल्यामुळें, पाश्चिमात्य देशांतील कलाकौशल्य व शास्त्रीय सुधारणा ह्यांचें त्या वेळी लोकांस अपूर्व कौतुक व चमत्कार वाटत असे. अर्थात् शास्त्रीय शोधांच्या प्रगतीची लोकांस कल्पना नसल्यामुळें, पाश्चिमात्य