पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/76

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३

वस्तू पाहून त्यांची मति थक्क होऊन जात असे; व ते शास्त्रीय ज्ञानाच्या अभावी असंस्कृत व भोळसर तर्क लढवून आपलें हास्यकारक अज्ञान मात्र व्यक्त करीत असत. त्यामुळें अनेक गमतीचे प्रकार वारंवार घडून येत असत. इ. स. १८१० सालीं, शिंद्याच्या दरबारचे ब्रिटिश रेसिडेंट मेजर मालकम ह्यांनीं, दौलतरावांकरितां एक उत्कृष्ट चार चाकी बगी इंग्लंडाहून तयार करून आणिली; व ती चार करड्या रंगाचे आरबी घोडे व त्यांचें उत्तम प्रकारचे कातडी सामान ह्यांसह त्यांस नजर केली. दौलतरावांनी व त्यांच्या दरबारी मंडळीनें अशा प्रकारचा अश्वरथ पूर्वीं कधीही पाहिला नव्हता. त्यामुळें त्यांस फार चमत्कार वाटला, व त्यांत कदाचित् दारूगोळा भरून ठेवला असेल असें समजून, त्यांनी त्या गाडीमध्ये प्रथम फकीर लोक बसविले ! अर्थात् मोठ्या प्रेमादरानें नजर केलेल्या बहुमूल्य अश्वरथांत फकीर बसलेले पाहून ब्रिटिश रेसिडेंटास काय वाटलें असेल, तें निराळें सांगावयास नकोच. ह्याचप्रमाणें आणखी एक अशीच मजेची गोष्ट घडून आली. एकदां रेसिडेंटानें दौलतराव शिंद्यांकरितां एक भव्य व सुंदर तंबू तयार करवून त्यांस नजर केला. तो पिंवळ्या रंगाचा असून त्याच्या अंतर्भागीं कांचेच्या तावदानांच्या प्रशस्त व रमणीय अशा खोल्या केल्या होत्या. ह्या तंबूमध्यें दौलतराव शिंदे ह्यांनीं एक मोठा मेजवानीचा समारंभ केला. त्या दिवशीं, कर्मधर्मसंयोगाने, रोषनाई करितांना मशालजीच्या नजरचुकीनें त्या तंबूस आग लागली, व तो सर्व जळून गेला. परंतु ही गोष्ट कोणाच्याच लक्ष्यांत न येऊन, जिकडे तिकडे अशी बातमी पसरली कीं, तंबूच्या कनातींमध्यें कळीच्या तोफा, दारूगोळा, व शस्त्रें ठेविली होती. त्यामुळे तो तंबू पेटून खाक झाला !! तात्पर्य, अशा गोष्टी त्या काळीं फार घडून येत असत, व त्यांच्या योगानें मराठी राज्यांत ज्ञानप्रसार कमी होता हे व्यक्त होत असे.

__________________