पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/79

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६

घेऊन, त्यांसच संस्थानचे सर्व आधिपत्य दिले; व त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणें दत्तक पुत्र घ्यावा असें ठरविले. ही गोष्ट बायजाबाईसाहेब व ग्वाल्हेर दुरबारचे मुत्सद्दी व सर्व प्रजाजन ह्यांस संतोषदायक झाली; व त्यांनी त्याबद्दल नामदार गव्हरनर जनरलसाहेब ह्यांचें व रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांचे फार फार अभिनंदन केले.

 बायजाबाईसाहेब ह्यांनीं ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांच्या विचारानें सर्व राज्यकारभार आपल्या हातीं घेतला; व ग्वाल्हेरचे सर्व मुत्सद्दी व सरदार लोक ह्यांच्या भेटी घेऊन त्यांस आश्वासने दिलीं. महाराजांच्या पश्चात् बायजाबाईसाहेब व त्यांचे बंधु हिंदुराव घाटगे ह्यांनी राज्याची सर्व व्यवस्था आपले हातीं घेतल्यामुळें व दरबारी लोकांस संतुष्ट केल्यामुळे, ग्वाल्हेर येथें कोणत्याही प्रकारे गडबड झाली नाहीं.

 बायजाबाईसाहेब ह्यांनी संस्थानच्या गादीचा धनी करण्याकरिता दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिक जनांची इच्छा होती; व तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट ह्यांनींही व्यक्त केली होती. ह्याकरितां बायजाबाईसाहेबांनीं दक्षिणेंतील शिंदे ह्यांच्या वंशापैकीं पांच मुलें हिंदुस्थानांत आणविण्याबद्दल कारकून व स्वार पाठविले. त्याप्रमाणें त्यांनी शिंदेघराण्याच्या निरनिराळ्या शाखेंतील मुलांचा शोध करून पांच मुलें ग्वाल्हेर येथे आणिलीं. शिंदे घराण्याचे मूळ पुरुष मानाजी शिंदे कन्हेरखेडकर हे होते. ह्यांच्या वंशजांपैकीं चांगजी शिंदे ह्यांच्या शाखेपैकीं पाटलोजी ह्मणून जे पुरुष होते, त्यांचा पुत्र मुकुटराव हा वयानें ११-१२ वर्षांचा असून, दिसण्यांत हुशार व तरतरीत असा होता. तो बायजाबाईसाहेबांनीं पांच मुलांतून पसंत केला. त्याला थोडें लिहितां वाचतां येत असून, घोड्यावर बसण्याचेंही ज्ञान होतें. त्यामुळें दरबारच्या मराठे मंडळीस त्याचीच निवड पसंत वाटली. ह्या मुलाची जन्मपत्रिका संस्थानच्या विद्वान् ज्योतिष्यांनीं पाहिली, व