पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/85

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१

ह्या एकाच गोष्टीवरून दौलतराव शिंद्यांचे दरबारीं हिंदुरावांची किती प्रतिष्ठा वाढली होती, ह्याची कल्पना करितां येईल. इ. स. १८२६ सालीं दौलतराव शिंदे ह्यांनीं, गव्हरनर जनरल लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांची आग्रा मुक्कामीं भेट घेण्याकरितां, आपल्या वतीनें हिंदुराव ह्यांस आपले प्रतिनिधि ह्मणून पाठविलें होते. अर्थात् हिंदुराव हे ग्वाल्हेर दरबारचे प्रमुख सूत्रधार बनल्यामुळें, दौलतराव शिंदे ह्यांच्या मृत्यूनंतर बायजाबाईसाहेबांनीं त्यांना आपले प्रधान मंत्री व सर्व राजकारणाचे आधारस्तंभ बनवावेत ह्यांत नवल नाहीं. बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दींतील बहुतेक राजकारणांत हिंदुरावांचा संबंध असून, त्यांच्या यशापयशाचा पुष्कळ वांटा त्यांच्याकडे आहे, असे ह्मणण्यास हरकत नाहीं.

 बापूजी रघुनाथः- हे जातीचे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु होते. ह्यांचें उपनांव दिघे. हे बडोद्याचे प्रख्यात मुत्सद्दी विठ्ठलराव देवाजी ह्यांच्या वशिल्याने गायकवाड सरकारच्या पागेचे अधिपति झाले. गायकवाड सरकारचें व धारच्या पवारांचे नातें होतें. गोविंदराव गायकवाड ह्यांची कन्या धारचे रणशूर व पराक्रमी राजे यशवंतराव पवार, जे पानिपतच्या तुमुल रणकंदनांत इ. स. १७६१ सालीं पतन पावले, त्यांच्या पुत्रास-ह्मणजे खंडेराव पवारांस दिली होती. त्यांचे पुत्र आनंदराव पवार ह्यांस गोविंदराव गायकवाडाच्या पत्नी गहिनाबाईसाहेब ह्यांची सख्खी भाची मैनाबाई ही दिली होती. आनंदराव पवार इ. स. १८०७ सालीं मृत्यु पावले. त्यांस औरसपुत्र नसून त्यांच्या पत्नी मैनाबाई ह्या गरोदर होत्या. त्या अबला आहेत असें पाहून, धारच्या पवारांचा मुरारराव नामक एक दासीपुत्र, स्वतः सर्व राज्यकारभार बळकावून, त्यांना फार त्रास देऊ लागला; व संस्थानांत दंगेधोपे करू लागला. त्यामुळें धार येथे झोटिंगबादशाही होऊन, शिंदे होळकर वगैरे प्रबल सरदारांस आपला फायदा करून घेण्यास चांगली संधि मिळाली. त्या वेळीं