पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/88

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४

बाई ही दिली होती. हिच्या पोटीं त्यांस एकंदर तीन कन्या झाल्या. त्यांपैकी एक धारचे राजे आनंदराव पवार ह्यांस आणि दुसरी महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस दिली होती. त्यामुळे बाबुराव दाभाडे बायजाबाईसाहेबांचे जावई होते. त्यांनी त्यांस दरमहा २५०० रुपयांची तैनात करून देऊन आपल्या दरबारांतील सरदारी सांगितली.

 यशवंतरावभाऊः–हे जावद प्रांताचे व मेवाडांतील इतर जिल्ह्यांचे सुभेदार होते. ह्या प्रांतांचा सर्व वसूल पूर्वीं त्यांच्याकडे सोंपविला असून, त्यांत त्यांनीं आपल्या हाताखालील सैन्याचा खर्च भागवावा, असा ठराव होता. यशवंतरावभाऊ हे दौलतराव शिंद्यांचे प्रख्यात सेनापति जिवबादादा बक्षी ह्यांचे चिरंजीव होत. ह्यांचे बंधु नारायणराव ह्यांस सर्जेराव घाटग्यांनी इ. स. १८०० मध्ये तोफेच्या तोंडी देऊन निर्दयपणानें मारिलें होते. यशवंतरावभाऊ हे शिंद्यांच्या दरबारांतील पुढारी सरदारांपैकी एक असून दौलतरावांच्या कारकीर्दींत ह्यांची फार भरभराट असे. ह्यांनी पेंढारी लोकांस इ. स. १८१७-१८ मध्यें साहाय्य केल्यामुळें व त्यांचें रक्षण केल्यामुळें ह्यांची व बंगालच्या सैन्याचे अधिकारी मेजर जनरल ब्रौन ह्यांची लढाई होऊन ह्यांच्या सैन्याचा फार नाश झाला होता. पुढें इंग्रज सरकारचा व दौलतरावांचा तह होऊन मेवाड प्रांत ग्वाल्हेर संस्थानांतून गेल्यानंतर यशवंतरावभाऊ हे ग्वाल्हेरीस येऊन राहिले. ह्यांची स्वतःची जहागीर ४०,००० हजारांची असून ती बायजाबाईसाहेबांनीं त्यांच्याकडे चालविली. ह्यांस शिंदे सरकारच्या दरबारांत फार मान असून हे त्या वेळच्या मुत्सद्दी मंडळींतील एक अग्रणी होते.

 लालाभाऊः—हे दौलतराव शिंद्यांचे प्रसिद्ध सरदार गोपाळराव भाऊ ह्यांचे चिरंजीव होत. शिंदे सरकारांकडून ह्यांस एक लाख रुपयांची जहागीर होती. ह्यांचे वय २५ वर्षांचे असून त्यांच्याकडे