पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/89

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५

दक्षिणेंतील सातारा जिल्ह्यापैकीं वांकडी व अहमदनगरपैकी बेलापुर अशीं दोन गांवें इनाम होतीं. ह्यांच्याकडे बायजाबाईसाहेबांच्या दरबारांतील सरदारीचे काम होतें.

 फकीरजी गाढवेः-हे सातारा जिल्ह्यांतील वाई गांवचे रहिवासी असून जातीचे धनगर होते. हे प्रथमतः महादजी शिंद्यांचे हाताखाली १०० स्वारांचे शिलेदार होते. ह्यांनी इ. स. १७९८ सालीं महादजी शिंद्यांच्या बायकांचे व दौलतरावांचे वैमनस्य होऊन जो दंगा झाला, त्या वेळीं सर्जेराव घाटग्यांस मदत केली; व पुढेंही वेळोवेळी अनेक साहसाचीं कृत्यें करण्यांत त्यांस साहाय्य केलें. त्यामुळे दौलतरावांची त्यांजवर मेहेरबानी जडून, त्यांस सैन्याच्या एका तुकडीचे स्वतंत्र आधिपत्य मिळालें होतें. ह्यांनीं सर्जेरावांच्या बरोबर जरी कांहीं निर्दयपणाचीं कृत्ये केली होतीं, तथापि पुढे गोपाळरावभाऊबरोबर उत्तर हिंदुस्थानांत त्यांनी शौर्याचीं चांगलीं कामेंही अनेक केली. त्यामुळें ह्यांच्या शूरपणाची शिंद्यांच्या दरबारांत प्रसिद्धी होती. बायजाबाईनीं फकीरजी गाढवे हे आपल्या यजमानाच्या वेळचे जुने सरदार आहेत असें पाहून, त्यांच्याकडे खासपागेपैकी २०० स्वारांचे आधिपत्य सांगितले.

 उदाजी कुटकेः–हे जातीचे धनगर असून अहमदनगर जिल्ह्यांतील कोळ पिंपळगांवचे राहणारे होत. हे दौलतराव शिंद्यांचे कारकीर्दीतील एक प्रख्यात सरदार होते. ह्यांच्याकडे 'सरनोबत' हा अधिकार असून २००० स्वारांच्या कांटिंजंट फौजेचे आधिपत्य होतें. ही फौज शिंदे सरकारची होती, तथापि तिच्यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांची देखरेख असे. हे नेहमीं गुणा येथील छावणीमध्यें राहत असत. बायजाबाईसाहेबांनी ह्यांच्याकडे सरनोबतीचे पद देऊन, पूर्वींप्रमाणेच कांटिंजंट फौजेचेही काम सांगितलें.

 माधवरावपंत ब्रह्माजीः-हे शिंदे सरकारच्या तोफखान्याचे अधिपति होते. हें काम त्यांच्याकडे इ. स. १८०९ पासून होतें. हे जुने