पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/95

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१

त्याप्रमाणें दौलतराव शिंदे वारल्यामुळें त्यांचे पश्चात् दक्षिणेंतील गांव खालसा करण्याबद्दल हिंदुस्थान सरकारचा ता. २४ मार्च इ. स. १८२८ रोजीं नवीन ठराव होऊन आला. तो ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी बायजाबाईसाहेब ह्यांस सादर केला. सुर्जीअंजनगांवच्या तहामध्यें इनाम गांवांची यादी बरोबर न देतां, अदमासानें कांहीं तरी नांवें दिलीं होतीं; त्या चुकीचा परिणाम आतां भोगण्याचा प्रसंग आला. बायजाबाईसाहेब ह्यांस शिंद्यांच्या घराण्याकडे फार दिवस चालत आलेले गांव सोडून देऊन दक्षिणेंतील आपला संबंध नाहींसा करणे इष्ट वाटेना. तेव्हा त्यांनीं रेसिडेंटमार्फत अनेक तडजोडी करण्याचे प्रयत्न केले. परंतु, इंग्रज सरकारास राजकीयदृष्ट्या शिंद्यांचा संबंध सातपुड्याच्या पलीकडे दक्षिणेंतील गांवांवर असणें बरोबर वाटत नसल्यामुळें त्यांनीं तीं गांवे आपल्या ताब्यात घेण्याचा आग्रह धरला. अर्थात् सार्वभौम प्रभूचा विशेष आग्रह पडल्यामुळें बायजाबाईसाहेबांस दक्षिणेंतील ८९ १/२ गांव इंग्रजांच्या ताब्यात देणें भाग पडले. त्याप्रमाणें त्यांनी आनंदराव दत्तात्रय कमाविसदार ठाणें जामगांव ह्यांस गांवे सोडण्याबद्दल सनद पाठविली. ती येणेप्रमाणेः-

 "राजश्री आनंदराव दत्तात्रय कमाविसदार ठाणें जामगांवः-

 स्नेहांकित बायजाबाई शिंदे दंडवत सु॥ तिस्सा अशरीन मयातैन व अलफ. सुर्जेअंजनगांवचे मुक्कामीं कंपनी इंग्रजबहादूर यांचा व आपला तहनामा झाला. त्यांत आठवे कलमांत, दक्षणचे रुखेशीं श्रीमंत पेशवेसाहेब ह्यांचे मुलुकांत, आपले पिढीदरपिढीपासून कितेक परगणे व तालुके व गांव सुदामत वडिलोपार्जित चालत आले, त्याप्रमाणें चालावे असा करार ठरला असतां, तहनामा करावयाचे समयीं कागद पत्राचा दाखला, वहिवाटीस तालुके व परगणे व फुटकर देहें चालत आहेत त्यांचा न पाहतां, गैरमाहितीनें जबानीवरून, परगणे व तालुके व देहें लिहिले; त्यांत सुदामतपासून वहिवाट चालत आली