पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४१

सूक्ष्म सपाट आरसे मिळून झालेले असतात, असे समजण्यास हरकत नाहीं. ह्मणजे, क, ख, ग, व घ हे भाग सपाट आहेत असे समजून, नियमित परावर्तनाच्या नियमांप्रमाणें दिक, दिख, दिगव दि घ या किरणांचें परावर्तन कसें होईल तें पाहावें. त त तबकडीपुढे कोणत्याही जागी दिवा ठेविला तर, त्याचे दि क, दिख, दि ग व दि घ हे किरण परावर्तन पावतांना समांतर होतात, असें नाहीं. तबकडीपुढें ज्या ठिकाणी ज्योत आली असतां तिचे किरण परावर्तन पावून समांतर होतात, ती जागा प्रत्येक तबकडीची वेगळी असते; आणि ती त्या तबकडीच्या वांकडेपणावरून कोणती ती काढितां येते. त्या जागेस केंद्र अशी संज्ञा आहे. अंतर्वक्र आरशाच्या केंद्रांतून ज्योत काढून जर त्या आरशाच्या बाजूला सरकवीत नेली, तर परावर्तन झालेले किरण पहिल्याप्रमाणें समांतर न होतां जास्त जास्त फांकत जातात; आणि आरशाच्या बाजूला न नेतां आरशापासून दूर दूर नेली, तर ते जास्त जास्त निमुळते होत जातात. यांच्या उलटही प्रकार खरा आहे. अशा आरशावर जर समांतर किरण पडले, तर त्यांचें परावर्तन होऊन ते त्या आरशाच्या केंद्रस्थानीं येऊन मिळतात. आणि ऊन्ह जर चांगलें असलें, तर त्या केंद्रस्थानीं विस्तवही पाडितां येतो.
 बहिर्वक्र आरसे. - यांचा प्रचारांत कोठें उपयोग करीत नाहींत. ह्मणून त्यांविषयीं येथें कांहीं विशेष सांगण्याचें प्रयोजन नाहीं. परावर्तनाच्या संबंधाचे जे सर्वसाधारण नियम आहेत ते ह्या आरशांसही लागू आहेत, एवढे सांगणें बस आहे.