पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५२

 ह्यावरून असे उघड दिसून येतें कीं, सगळीं माणसें सारखी आहेत, त्यांत कमजास्तपणा कांहीं नाहीं,- त्यांत लहानमोठें कोणी नाहीं, असें जें ह्मणणें आहे, तें कांहीं शब्दशः खरें नाहीं. तर मग, सगळी माणसें सा- रखीं आहेत ह्याचा अर्थ समजावयाचा किती ? ह्याचें उं- त्तर एवढेंच कीं, स्वातंत्र्याच्या संबंधाने सगळीं प्रौढ समं - जस मनुष्यें एकसारखीं आहेत. अमकें माणूस राजकुळांत जन्मलें आहे ह्मणून दुसन्या अमक्या माणसाने त्याचें गु- लाम व्हावें, आणि, इच्छा असो कीं नसो, त्याकरितां म- रावें, हें कांहीं कायदेशीर नाहीं- आपल्या स्वातंत्र्याच्या संबंधानें राजाला जितकी मुखत्यारी आहे, तितकीच रं- काला आहे, असा त्याचा अर्थ समजावयाचा. ज्या काय- द्यांच्या योगानें एक मनुष्य दुसऱ्याचा धनी होतो, आ- पल्या सुखाकरितां, जबरदस्तीनें, दुसऱ्याच्या सुखाच्या आड येतो, ते कायदे चालूं देणें हें अन्यायाचें आणि म नुष्याच्या नैसर्गिक अधिकारांस फार बाधक आहे, असे समजावयाचें.
 तर मग, सगळ्या माणसांमध्यें अभेदसमता असणें हें तर अशक्य झालेंच. तथापि, एक गोष्ट सिद्ध झाली; ती ही कीं, कायदे जे आहेत ते सगळ्यांस सारखे लागू व्हावे, त्यांत श्रीमंत आणि दरिद्री, थोर आणि लहान हा भेद नसावा, आणि कायद्यांचा फायदा सर्वोस सारखा मिळावा, हा काय तो सगळा हेतु राज्यव्यवस्थेचा आहे. हा उत्तम प्रकारें साधला, ह्मणजे ती राज्यव्यवस्था उत्तम ह्मणाव- याची. अशी व्यवस्था स्थापित व्हावी, असे प्रयत्न यथा- शक्ति करणें, हें प्रत्येक समंजस माणसाचें कर्तव्य आहे.