या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न १.बाल संरक्षण संस्था म्हणजे काय ?
उत्तर :  एकात्मिक बाल संरक्षण योजना महाराष्ट्र शासनाने दि. १३ ऑगस्ट २०१० रोजी केंद्र शासनाबरोबर सामंजस्य करार करून अस्तित्वात आणली.

 या सामंजस्य करारानुसार केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली.

 बाल न्याय अधिनियम म्हणजेच मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २००० (२००६) तसेच बालकांविषयी इतर सर्व कायदयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जी अस्तित्वात आली ती संस्था म्हणजे बाल संरक्षण संस्था.

 केंद्र शासनाने आखून दिलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे.

प्रश्न २.एकात्मिक बाल संरक्षण योजने नुसार झालेला शासन निर्णय सांगा.
उत्तर :  महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक संरक्षण योजनेतंर्गत ग्राम, तालुका व नगर बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याबाबत ‘शासन निर्णय' १० जून २०१४ रोजी करण्यात आला.

 महाराष्ट्राच्या सर्व ३५ जिल्ह्यांमध्ये राज्य दत्तक स्त्रोत संस्था (SARA) अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. बाल अधिनियम म्हणजेच ज्युवेनेल जस्टिस अॅक्ट २००० (२००६) च्या कलम ६२ अ व सुधारित महाराष्ट्र बाल न्याय नियम २०११ च्या कलम १४ नुसार महाराष्ट्र बाल संरक्षण संस्था आणि त्या अंतर्गत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.