या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न ४.मुलांची काळजी व संरक्षण घेण्यासाठी स्वतंत्र समितीची गरज का निर्माण झाली ?

उत्तर :  बालकांविरोधी हिंसे मध्ये अनेक पटीने वाढ झाली. बदललेल्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीमध्ये कुटुंबात मुलांची काळजी आणि संरक्षण होणे अनेक पालकांच्या बाबतीत अडचणीचे होवू लागले. कुटुंब आणि कुटुंबातील घटक प्राप्तपरिस्थितीमध्ये म्हणजे असुरक्षित स्थलांतर, अत्यंत हलाखीची गरीबी, पालकांचे दिर्घकालीन आजारपण किंवा मृत्यु यामुळे बालकांची काळजी, संरक्षण करण्यात कमी पडतात.

 मुलांसाठीच्या औपचारिक संरक्षणाच्या यंत्रणा तुलनेने कमी पडतात. मुलांची असुरक्षितता त्यामुळे वाढते. मुलांची उपेक्षा, हिंसा आणि शोषण या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ग्रामपातळीवर तालुका पातळीवर, संरक्षित यंत्रणा म्हणजेच community based structure अस्तित्वात असणे गरजेचे बनले. अशा बाल संरक्षण समित्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि संरक्षक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्वाच्या ठरतात. म्हणुनच गावपातळीवर आणि तालुका पातळीवर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पातळीवर कार्यरत राहून संरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी या समित्या कार्यरत आहेत.