पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९७ )

त्यांची शुश्रूषा करावी; ( ४ वारंवार त्यांना उत्तम भोजन द्यावें आणि ( ५ ) उत्तम कामाकरितां त्यांनां बक्षिस द्यावें. ह्या पांच गो- टींनी खालची दिशा जे सेवक त्यांची जर धन्यानें पूजा केली, तर ते पांच प्रकारांनी त्याला उपकारक होतात : - ( १ ) धनी उठण्यापूर्वी ते उठतात ( २ ) धनी निजल्यावर निजतात; ( ३ ) धन्याच्या मालाची चोरी करित नाहींत ; ( ४ ) उत्तम तऱ्हेनें काम करतात; आणि ( ५ ) सर्वत्र धन्याची कीर्ति पसरवितात. याप्रमाणें केलेली खालच्या दिशेची पूजा सुखावह होते.
 "हे गृहपतिपुत्र ! पांच गोष्टींनीं गृहस्थाने वरची दिशा जे साधु- संत त्यांची पूजा करावी : - ( १ ) देहानें त्यांचा आदर करावा; (२) वाचेनें आदर करावा; ( ३ ) मनानें आदर करावा; ( ४ ) त्यांनां कांहीं लागल्यास द्यावें; आणि ( ५ ) भिक्षेला आले तर त्यांनां आडकाठी आणूं नये. ह्या पांच गोष्टींनीं जर वरची दिशा जे साधुसंत त्यांची गृहस्थानें पूजा केली तर ते त्याला पांच प्रकारांनीं उपकारक होतात : - ( १ ) पापापासून त्याचें निवारण करितात; ( २ ) कल्या- कारक मार्गाला लावतात; ( ३ ) प्रेमपुरस्सर अनुग्रह करितात; ( ४ ) उत्तम धर्म शिकवितात; आणि ( ५ ) शंका निवारण करून मनाचें समाधान करितात. याप्रमाणें केलेली वरच्या दिशेची पूजा गृहस्थास हितावह होते.
 "हे गृहपतिपुत्र ! दान, प्रियवचन, अर्थचर्या ह्मणजे उपयोगीं पडणे, आणि समानात्मता, ( दुस-याला आपणासारखें लेखणें ) अशीं हीं चार लोकसंग्रहाची साधने आहेत. हीं साधनें जर आईबापांपाशीं नसती तर केवळ जन्म दिलें ह्मणून मुलाने आईचा किंवा बापाचा गौरव केला नसता. ज्याला हीं चार साधनें सांपडली तोच प्रपंचांत यशस्वी होतो.
 हा बुद्धाचा उपदेश ऐकून सिगाल संतुष्ट झाला, आणि तेव्हांपासून तो बुद्धाचा उपासक बनली.



 १ सिगालसुत्ताचें हें रूपांतर मासिक मनोरंजनाच्या एप्रिल १९०९ च्या अंकांत छापलें होतें. तें संपादकांच्या परवानगीनें येथें घेतलें
 बु० ९