पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५५ )

 यश भिक्षू झाला, हें वर्तमान जेव्हां विमल, सुबाहु, पूर्णजित् आणि गपति ह्या त्याच्या चार मित्रांनीं ऐकिलें, तेव्हां ते ऋषिपत्तनांत जाऊन यशास भेटले. यशाने त्यांस बु- द्धाजवळ नेलें. बुद्ध भगवंताच्या उपदेशानें त्यांच्या मनांत प्रकाश पडला, व त्यांनीं तेथल्या तेथेच भिक्षुसंघांत प्रवेश केला. ही गोष्ट त्या प्रांतांतील यशाच्या पन्नास मित्रांस समजल्यावर त्यांनीहि ऋषिपत्तनांत बुद्धाची भेट घेऊन बौद्धसंघांत प्रवेश केला. याप्रमाणें भगवान् ऋषिपत्तनांत राहत असतां त्यांजपाश साठ भिक्षूंचा संघ जमला. हे सगळे भिक्षू अर्हत्पदाला पावले होते. त्यांना एकत्र जमवून बुद्ध ह्मणाले :- " भिक्षू हो, प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशांतून मी मुक्त झालों आहें; आणि भिक्षू हो, तुह्मीहि या पाशांतून मुक्त झालां आहांत. तेव्हां आतां भिक्षूहो, बहुजनांच्या हितासाठीं, पुष्कळांच्या सुखासाठीं, लोकांवर अनु- कंपा करण्यासाठीं, देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठीं, धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गानें दोघे जाऊं नका. प्रारंभी कल्याणप्रद, मध्यंतरीं कल्याणप्रद व शेवटीं कल्याणप्रद अशा ह्या धर्ममार्गाचा उपदेश करा."
 या साठ भिक्षूंना बुद्धाने स्वतः दीक्षा दिली होती 'एहि भिक्षु' ह्या बुद्धोक्त वाक्यानेंच त्या वेळीं प्रव्रज्याविधि होत असे. परंतु जेव्हां हे भिक्षू चोहोंकडे पाठविण्यांत आले, तेव्हां- पासून नवीन भिक्षूंची संख्या वाढत चालली. दूरच्या प्रदेशांतून भिक्षुसंघांत प्रवेश करण्याची इच्छा करणाऱ्यांना बुद्धाजवळ घेऊन जाणे कठीण पडूं लागलें. ह्मणून बुद्धानें भिक्षूला अशा उमेदवारांना परस्पर संघांत घेण्याची परवानगी दिली. बुद्ध ह्मणाले:-
 “ भिक्षू हो, यापुढें भिन्न भिन्न राष्ट्रांत तुह्मींच प्रव्रज्या द्या