२६ बृहद्योगवासिष्ठसार. तो आपल्या जीवास धोक्यात घालूनही सुखाचे साधन ह्मणून मानलेलें द्रव्य मिळविण्याची इच्छा करितो. पण जेथे संग्रह आला तेथें सुख कोठचें ? मग तो संग्रह धान्याचा असो, वस्त्राचा असो, की पांढन्या व पिवळ्या मातीचा असो. मधाचा संग्रह करावा अशी इच्छा होताच मधमाशाना त्या मधाचेच दास्य करावे लागते व शेवटी तो मधच त्यांच्या नाशास कसा कारण होतो ते सर्वीस ठाऊक आहेच. द्रव्याच्या संग्रहासच लक्ष्मी ह्मणतात. पण ती सदां एके ठिकाणी रहात नाही. सज्जनांची व सदाचरणी धार्मिकाची तर तिला फारच भीति वाटते. कारण ते तिला इतस्ततः धावू न देता अडकवून ठेवितात. त्यामुळे तिला फार दिवस एके ठिकाणी रहावे लागते. दुर्गुण हे तिचे पळून जाण्याचे मार्ग आहेत. पण धार्मिक सज्जन त्या मार्गावर सद्गुणाचा पहारा ठेवितात. शस्त्रसपन्न निर्दय चोर तिला घरांतून ओढून नेतात आणि व्यसने व विषय तिला लुटतात, हे जाणून, ते सद्गृहस्थ तिला आपल्या गहांत पेटीत घालून ठेवित नाहीत; तर अन्नादिकास महाग झालेल्या सत्पात्री तिचा विनियोग करितात व व्यसन आणि विषय याना मुळी थाराच देत नाहीत. पण अशा रीतीने चोहोकडून कोंडमारा झाला असता तिला फार क्लेश होतात. कारण एकाद्याच्या इच्छेविरुद्ध व स्वभावाविरुद्ध एकादे कृत्य घडणे, हेच त्याच्या क्लेशाचें मूळ असते. त्यामुळे एकदा तिला बाहेर पडावयास अवकाश मिळाला ह्मणजे पुन. ती असल्या लोकांच्या हाती सांपडत नाही. ह्मणूनच सज्जन धार्मिकास प्रायः दरिद्रात दिवस काढावे लागतात. या लक्ष्मीस भाडणे, मारामाऱ्या, उलाढाल्या, चळवळी, अन्याय, बलात्कार इत्यादि- काची फार आवड असते व या गोष्ठी तर प्राण्यास दुःखी केल्यावांचून घडत नाहीत. ह्मणून मी या लक्ष्मीचा तिरस्कार करितो. बाकी ससा- राचे अवश्य ते कार्य करून घेण्यापुरता हिचा योग्य उपयोग केल्यास त्यात काहीच वावगे होणार नाही. पण ससाराविषयी जे अत्यत विरक्त झाले आहेत, त्यास ही लक्ष्मी विषवल्लीसारखी भयकर, पाण्यावरील तरगाप्रमाणे चंचल, दुःखरूपी सर्पाची गुहा, सत्कार्याची वैरीण, भीतीचे आगर, शूरास मृत्यूच्या मुखात लोटणारी, तरवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण व सर्व प्रकारच्या अनर्थाचे कारण आहे, असे वाटल्या- वाचून रहाणार नाही. मुनिराज, मला मोठे आश्चर्य वाटते ते हेच की, हे
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/३०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही