पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०. पुण्यांतील शिक्षण. बापूंनी 'तूं प्रमाण तरी किती घेतलेस,' म्हणून चौकशी केली. खरा प्रकार कळून आल्यावर बापूंना इतका विस्मय वाटला की, 'तुझ्यापाशी आपल्या वैद्यकीचा कांही उपयोग नाहीं, ' म्हणून त्यांनी यांची पाठ थोपटली. कारण तें भस्म अत्यंत जलाल असून चांगल्या सशक्त माणसास देखील थोड्या प्रमाणांतच कांही अनुपानाबरोबर पचण्याजोगें होतें. त्या भस्माचा एकदमच स्वाहा करून तें सबंध जिरवून टाकणाऱ्या माणसावद्दल ' हा आहे तरी कोण ? ' असे वाटून बापूंनी स्तंभित होणे साहजिक होतें. आपल्या अंगांत एका घोड्याचें वळ अस- ल्याबद्दल ते नेहमी सांगत असत. जाडा दोरखंड हिसक्यासरशी तट्कन् तोडणें, पाण्याने भरलेल्या घागरी दोन्ही हातांत दोन आणि दातांत एक अशा धरून डेक्कन कॉलेजपासून घरी येणे, वानवडीपासून स्वाराच्या गेटापर्यंत पैज लावून, लष्करी सोजिरांबरोबर धांवण्याच्या शर्यती जिंकणें, वगैरे त्यांचे त्यावे- ळचे अनेक करमणुकीचे प्रकार असत. पुण्यांत डेक्कन जिमखान्याची २७ मैलांची शर्यत झाली, त्या वेळेला ते स्वतः मला म्हणाले कीं, “ लहानपणीं हीं शर्यत मी थोड्याशा अभ्यासानें सहज जिंकली असती ! " शाळेतील हूडपणाची एक गोष्ट सांगूं. एका इंग्रजी शिक्षकास टोपी उपडी करून ठेवण्याची संवय असे. एक दिवस यांनी, अतीशय वस्त्रगाळ राख घेऊन, त्या टोपींत बेमालूमपणानें भरून ठेवली. बोलण्याच्या भरांत, साहेब मजकु- रांनीं टोपी जेव्हां चटकन् डोक्यावर ठेवली, त्यावेळी वर्गात काय हंशा पिकला असेल याची कल्पना करावी ! यांच्या बुद्धीबळाविषयीं तर कोठेंच वाद नाही. एकपाठी स्मरणशक्ति, लहानपणी वाचलेलें देखील ७० व्या वर्षी जसेंच तसें म्हणून दाखविण्याजोगी अद्भुत धारणाशक्ति, कुशाग्रतेनें कोणत्याही विषयांत शिरून मुद्दा हाती घेणारी 'मर्मग्राही बुद्धि, उन्मेषशाली कल्पकता, कोटीबाजपणा, आणि न्यायपांडित्यास आवश्यक असणारा समतोलपणा, या सर्व अंगांनी तेथे बुद्धी विलास करीत होती. शाळेत असतांना अमुक एक अभ्यास म्हणजे यांनी कधीं पद्धतशीर केला आहे, असे कधी झालेच नाही. नित्य पाठ करावयाचे विषय शाळेत जातांना रस्त्यावरच बहुतकरून होत असत ! त्यांच्या लहानपणी एकदां सर्व मुंबई इलाख्यांतील शाळांतील मुलांची स्मरणशक्तीबद्दल परीक्षा घेतली होती, तींत अण्णासाहेब व त्यांचे स्नेही भाजेकर म्हणून कोणी होते ते, असे दोघे सर्वात वर आले !