पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमहाराजांचें भजन प्रेम. १०३ अथवा अतिशय धूर्त व व्यवहार पटु असा सामान्य माणूस, असे अनेक समज त्यांच्याविषयीं होते; अशा स्थितींत त्यांच्याविषयी वाईट समज असणे जरी शक्य नव्हतें, तरी एकदमच अतिशय उच्च भावना झाली असेल हें संभवत नाही. 'महाराज नरसिंहसरस्वती म्हणजे प्रत्यक्ष देव, परमात्मा अशी आपली खात्री एकदम झाली नाहीं; पहिल्यांदा कोणी विद्वान्, योगाभ्यासी अथवा सिद्ध पुरुष असले कांहीं वाटत होते. पुढे हळूहळू जसजसा, अनुभव आला, तसतशी ही समजूत पालटून महाराज म्हणजे प्रत्यक्ष देवच अशी खात्री झाली,' असे ते नेहमीं सांगत. त्यामुळे पहिल्या पहिल्यांदा महाराजांनीं कांहीं म्हणावें व यांनी तसें मुद्दाम करूं नये, ज्या त्या गोष्टींत महाराजांशी वाद घालावा व महाराजांनी हळूहळू युक्तीयुक्तीनें यांना इष्ट त्या वळणावर आणून सोडावें, अशी 'लठ्ठालठ्ठी' फार चाले. परंतु ही स्थिति फार टिकली नसावी. महाराजांच्या कांहीं गोष्टीवरून येथें अपार्थिव ज्ञान आणि सामर्थ्य आहे, एवढी तर त्यांची फारच लौकर खात्री झाली, व ल्यामुळे व विशेषतः महाराजांनी त्यांचेवर जो लोभ केला त्यामुळे अण्णासाहेब हे पुरते ओढले गेले. आळंदीस राहूं लागल्यानंतर महाराजांनी पहिली गोष्ट अशी केली की तेथील लोकांत भजनाची गोडी उत्पन्न करून नादब्रह्मानें आळंदी क्षेत्र आनंदमय करून सोडलें. स्वतः महाराज यांची स्थिति अशी होती की ' श्रीविठ्ठल ' नामाचा गजर ५/१० मिनिटें कानांत पडला की त्यांचें देहभान हरपून जात असे व शरीर लाकडासारखें होऊन जाई. त्यांच्या रंगेल राहणीमुळे व विनोदी- वृत्तीमुळे आळंदीचे लोक देखील प्रथमतः त्यांच्या विरुद्ध होते व प्रारंभी महाराजांना बराच त्रासही झाला परंतु पुढे पुढे सर्वांची महाराजांवर श्रद्धा बसली, व त्या टवाळ लोकांना हातीं धरूनच महाराजांनी आळंदीचे प्रख्यात भजनमंडळ निर्माण केलें. लोकांत नाच तमाशे वगैरेंची आवड जास्त. परंतु हळू हळू नाच तमाशे बंद होऊन त्याच लोकांची भजनावर आवड बसली, व त्याच्या जोडीस नाथभागवत ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथांच्या द्वारें महाराजांनीही त्यांना धर्मज्ञान दिले. या सर्व काळांत बहुतकरून महाराज केव्हां पुण्यास तर केव्हां आळंदीस असत. अण्णासाहेब पुण्यास आले म्हणजे त्यांच्या दर्शनास जात. त्यांचा नेम असा होता कीं रात्रीं दर्शनास जावें. संध्याकाळच्या सुमारास पुण्याहून निघून व दर्शन वगैरे करून पहाटेस पुन्हा परत येत. बाहेर दिसावयास