पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/170

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. आजकाल प्राणघात करण्याच्या कामी येणाऱ्या हरत-हेच्या साधनांवर किती तरी चातुर्य व परिश्रम खर्च होताहेत, याचा विचार मनात येऊन, भारी वाईट वाटते. पण सध्यांच्या परिस्थितीत असे होणे अपरिहार्य आहे. कारण, या कामी अतोनात खस्त खावी लागत आहे, हे खरे. तरी या सर्व नाशकारक शस्त्रांच्या तयारीचा अंतिम हेतु शांतता व स्वस्थता कायम राखण्याचा असल्याने, राष्ट्रीय संरक्षणाला त्यांची अत्यंत आवश्यकता आहे. मनुष्यस्वभावच असा आहे की, प्रसंग पडल्यास दोन हात करण्याची तयारी असल्याशिवाय कोणत्याही मोट्या राष्ट्राला शांतता राखण्याची आशा करणे व्यर्थ आहे. टार्केच्या जवळपासच्या काही शेतवाड्या व मळे पाहून येण्यामध्ये एके दिवशी तिसऱ्या प्रहराचा काळ आम्ही मोठ्या मजेने काढला. इकडील शेतकरी-जमीनदार-चांगले सधन, हिंदुस्थानांतील लहानसहान इनामदारांसारखे आहेत. ते नियमाने वर्तमानपत्रे वाचतात, आणि साऱ्या देशभर शेतकीमध्ये चाललेल्या सुधारणासंबंधाने चांगली माहिती करून घेतात. ते आसपासच्या भागांतील निवडणुकीमध्येही भाग घेतात, व राजकीय बाबतीत स्वतंत्रपणे आपली मतें ठरवू शकतात. त्यांची लोकांमध्ये चांगली मान्यता असते. निवळ व्यापारधंदा करणारांपेक्षां सामाजिक बाबतीत त्यांची योग्यता बरीच वरिष्ठ प्रतीची समजली जाते. १४८