पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ६ ]

चिंतामुक्त करण्यासाठीं बाह्य परिस्थितीची सांगडही त्या प्रभूनें चांगलीच जुळवून आणली. कंसाच्या भयानें धस् धस् करणारें देवकीचें पोट अकालींच आंतील गोळ्यास बाहेर टाकून रिकामे झाले. पण ते सर्व ऐहिक दृष्ट्या त्यांच्या पथ्यावरच पडलें. असो. ' विजय ' मुहूर्तावर जन्मलेल्या या बालकानें सर्वत्र स्वातंत्र्याचा-प्रेमाचा - भक्तीचा विजयच केला हे साहजिकच आहे. स्वातंत्र्याचा जन्म 'विजय' मुहूर्तावरच व्हायचा ! प्रसूतांची वेळ जसजशी जवळ येत चालली तसतशी देवकीची तंद्री लागूं लागली. अशा रीतीनें स्वस्वरूपाचे - त्या चिदानंदाचे ठायी देवकीची वृत्ति तदाकार होऊन रंगून गेली आहे तोंच त्या पारतंत्र्याच्या अंधार कोठडींत कोटिरवीच्या तेजाची प्रभा ज्याच्या मुखमंडलावर फांकली आहे अशी वैकुंठनायकाची आठ वर्षांची अयोनिसंभवा मूर्ति देवकीपुढे उभी राहिली ! - देवकीचीं गर्भ-चिन्हें मावळलीं—स्वातंत्र्याचा जन्म झाला ! सर्व विश्वांत भरलेलें चैतन्य आज साकार झाले ! कंस-चाणूरांसारख्या दुष्टांनीं पृथ्वीला त्राही त्राही केलें असतां गोमातेच्या रूपानें वैकुंठास जाऊन पृथ्वीने केलेल्या प्रार्थनेचें फळ मिळालें. धर्माची ग्लानि होऊन अधर्माचें बंड जगावर माजले होतें, गोब्राह्मणांचे हाल होत होते, प्रजा कंसाच्या त्रासानें गांजून गेली होती, पतिव्रतांच्या अश्रूंचे धिंडवडे उडत होते, व साधूंचा छळ होन होता यासाठीं तो ' ब्रह्मण्य देव, ' तो “ पतिव्रतांचा पाठिराखा परमेश्वर, " गोब्राह्मणहितकर्ता तो जगदीश, साधूंचें परित्राण व दुष्टांचें निर्दलन करणारा तो परमात्मा आज भूलोकावर अवतरला होता. पापाच्या-अज्ञानाच्या निबिड, काळ्याकुट्ट अंधकाराचे मेघ व पर्वत पसरले होते पण या अज्ञानाचे आंधारे गिळून घालायला " पापाचा अचळु फेडायला " पुण्याची पहाट फुटायला " श्रीकृष्णमूर्तीचें रविमंडळ जगदाकाशाच्या क्षितिजावर उदय पावलें -प्रगटलें ! “ आपुल्याचेनि कैवारें " तो भक्तवत्सल परमात्मा आज " साकार होऊनि अवतरला होता ! " " सुखाचि गुढी " जगांत " उभवायला," " भक्तांला सात्विकाचीं दोंदें निघायला " आज "दोवरि दो भुजा घेऊन " प्रत्यक्ष लक्ष्मीवल्लभ त्या तुरुंगांत अवतीर्ण झाले होते. युगायुगाचे ठायीं याच कार्यासाठी त्या प्रभूचा अवतार होत असतो. अष्ट वर्षांची ती घनश्याम बालमूर्ति पाहून व पहातां पहातां देवकी देहभान विसरली ! ईश्वरी प्रेरणेनें ती सावध झाल्यावर तिला साहजिकच पान्हा फुटला व " मी वैकुंठनायक तुझ्या पोटी आलो आहे. पण मी अयोनिसंभव असल्यामुळे माझ्या ह्या अष्टवर्षाच्या मूर्तीकडे पाहून तुला भिण्याचें किंवा आश्चर्य