पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८ ]

तुमच्या, आईच्या व सर्वोच्याच कल्याणासाठीं मला गोकुळास जावयास नको काय? चला तर शोक आवरा. हं, हे पहा मी पुन्हां बालरूप होतों ! आटपा ! " असें म्हणून देवानीं खरोखरच बालमूर्ति धारण केली. मोठ्या कष्टानें त्या दंपत्यानें आपला शोक आवरत घेतला. स्वातंत्र्याच्या दर्शनानें कोण बेभान होत नाहीं ? - तन्मय होत नाहीं ? तसेंच स्वातंत्र्याचा विरह कोणास रडवीत नाहीं ? मग आमच्या वसुदेव-देवकीची तशी स्थिति झाली असल्यास त्यांत आश्चर्य तें काय ? पण शेवटी भावी गोष्टीवर व ईश्वरी वचनावर विश्वास ठेवून त्या नवराबायकोनीं आपला शोक आंवरला; देवकीनें हुंदके देत पुन्हां एकदां त्या श्यामसुंदर गोजिरवाण्या प्रभूस स्तनाशीं घेतलें- प्रभूनीं शेवटचें मातृस्तनपान केलें. आपल्या जिवाचा कलिजा - - पंचप्राण वांचवावा, आपल्या प्रीतिलतेवर फुललेलें है शेवटचें फूल तरी निदान त्या निर्दयाच्या हातांत न पडावें असें साहजिकच देवकीस वाटून ती “ या बाळाला कसेंहि करून वांचवाच" अर्से आपल्या भर्त्यास म्हणाली. वसुदेवाच्याहि मनांत तें होतेंच. शिवाय दोघांसही ईश्वरी आदेशाचें वरीलप्रमाणें आश्वासन मिळालें होतें. तेव्हां विलंब न लावतां " कंसभयानें वसुदेवानें त्या सुंदर बालकास नंद यशोदे वाहण्या " साठी पार्टीत घातलें व पाटी डोक्यावर ठेवली. त्याबरोबर त्याच्या पायांतील शृंखला खळ् कन् गळून पडल्या ! स्वातंत्र्य ज्यानें मस्तकीं धारण केले त्याच्या पायांत दास्याच्या बेड्या कोठून राहणार ? वसुदेव तुरुंगाच्या दाराशीं आल्याबरोबर त्याचीं भक्कम कुलपें सुद्धां गळून पडलीं ! जिवंत स्वातंत्र्याचा मार्ग निर्जीव वस्तु कुठवर अडवणार ? वसुदेव बाहेर येऊन भयभीत मुद्रेनें इकडे तिकडे पाहतो तो एरवीं डोळ्यांत तेल घालून पहारा करीत आलबेल " देणारे पहारेकरी डाराडूर घोरत आहेत ! स्वातंत्र्योदयाचे काळ अशाच ' मी मी' म्हणणारास सुद्धां मोहनिद्रेच्या झपाट्यांत- चैतन्यशून्य झोंपा लागून स्वातंत्र्याचा अनिरूद्ध संचार होत असतो ! तेव्हां वरील रीतीनें वसुदेव बाहेर पडून यमुनेच्या मार्गास लागला हैं ठीकच झालें. वसुदेवानें क्षणैक आकाशाकडे पाहिले तो मघांचा तो मुसळधार पाऊस कोठच्या कोठें पार नाहींसा होऊन आकाश निरभ्र झाले होते व त्यांत लक्षावधि तारकांचा नाच सुरू होता. सर्वत्र शांततेचें साम्राज्य पसरलें होतें. दूरवर यमुनेच्या जलाचा नाच चालला होता, त्याचा खळखळाटध्वनि त्या प्रशांत वेळीं गंभीरपणे ऐकूं येत होता. आज स्वातंत्र्याचा जन्म झाला म्हणूनच की काय चंद्रनक्षत्रांची व यमुनाजलाची स्वतंत्र सृष्टी आनंदानें नाचत होती. परंतु बांकीचे--परवशतेच्या दास्यांत लोळणारे मथुरें-