पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ९ ]


तील इतर जीव निद्रावश झाले होते ! त्रैलोक्यनाथ वैकुंठाधिपति आज साकार होऊन अवतरले म्हणून प्रमुदित झालेल्या निसर्गानें काजव्यांच्या झगझगाटाचा जागोजाग दीपोत्सव केळा; व मेघांनीं वर्षिलेले प्रेमाश्रूंचे बिंदु वृक्षही आपल्या पर्णोवरून टप् टप गाळूं लागले !

 पुढे जाण्यापूर्वी वाचकांस हेही सांगितले पाहिजे की, ज्या चिन्मयस्वातंत्र्यमूर्तीला वसुदेव मस्तकीं धारण करून यमुनेकडे चालला होता ते बालक देवकीच्या गर्भारपणीं तिच्या पोटांत असतांना देवकीस चिन्मयस्वातंत्र्याचेच डोहाळे लागले. होते व त्या बालकाच्या भावी परराक्रमाच्या भावना ती तन्मयपणे बोलत होती. " कुठे आहे तो दुष्ट कंस ! आणा त्याला इकडे. आत्ता त्याला ठार करतों ! पृथ्वीचा छळ करणाऱ्या दुष्टांचा सत्यनास केल्याशिवाय मी कधीं रहायचा नाहीं ! आणा, आणा त्या कंसाला इकडे. ये ह्मणावं माझ्यापुढे की तुझी हार्डेच पिचून टाकतों ! दुष्टा ! साधूंचा छळ करतोस नाहीं का ? पतिव्रतांची अब्रू घेऊं पहातोस काय ? गोमातेचा वध करायला प्रवृत्त झालास काय ? घे तर त्याचें हें प्रायश्चित्त ! " असे म्हणून देवकी एखाद्या ‘ प्रेषिता ' सारखी खरोखरच तिच्या दिव्य दृष्टीसमोर भासणाऱ्या कंसास मारण्यास धांवे व तिला आवरतां आवरतां व शांत करतां करता वसुदेवास पुरेवाट होई ! हिचें हें असले बडबडणें कंसाच्या कानावर जाऊन आतांच कांहीं अनर्थ ओढवतो की काय अशी बिचाया वसुदेवास क्षणोक्षणी धास्ती वाटे. अशातऱ्हेनें गर्भावस्थेपासूनच आपल्या पराक्रमाची चुणुक दाखवणारें बालक सध्यां वसुदेवाच्या डोक्यावरील पार्टीत सुखाने " आत्मानंदी " त मग्न होऊन पडलें होतें ! कौसल्येसही रामाच्या वेळेस असेच डोहाळे लागून "कुठे आहे तो दुष्ट रावण !” इत्यादि रीतीने ती बोलत असे व काल्पनिक रावणास मारण्यास धांवत असे. त्यावेळेस तिला आवरतां आवरतां तिच्या दासींची व दशरथाची अशीच तिरपिट उडत असे. गर्भारपणच्या डोहाळ्यांवरून भावी मुलाची कल्पना होते म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. असो.

 त्या बालकास डोक्यावर घेऊन वसुदेव तुरुंगाच्या बाहेर पडला – स्वातंत्र्याच्या मोकळ्या मैदानांत आला तेव्हां त्यास किती आनंद झाला असेल याची वाचकांनींच कल्पना करावी ! वसुदेवानें क्षणैक वर पाहिलें ! आकाशप्रांगणांत लक्षावधि नक्षत्रें स्वातंत्र्यगीत गात नाचत होतीं. त्याने समोर दृष्टि फेंकली ! नक्षत्रांच्या अंधुक प्रकाशांत आपणासमोर यमुना नदी कलकलवानें तेंच स्वातंत्र्यसंगीत गात नाचत जात