पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १० ]

असलेली त्याला दिसली ! निशीथकालीन वायूच्या स्वतंत्रलहरी त्याच्या अंगावरून चहात होत्या ! खालीं वर व आसपास स्वातंत्र्याचा हा रम्य देखावा पाहून त्याच्या शरीरावर हर्षरोमांच उठले ! ' इतक्या दिवस मी केवढ्या दिव्य सुखास अंतरलो होतों ' हा विचार त्याचे मनांत येऊन व तुरुंगांतला तो भयाण देखावा दृष्टीपुढे येऊन त्यानें एक लांब सुस्कारा सोडला. व आनंदित आणि उल्हासित मनानें तो पुढे चालू लागला. " अहाहा ! स्वातंत्र्याचा केवढा हा निर्भेळ आनंद !” वाट चालत असतां वसुदेवाच्या हृदयसागरावर त्याच स्वातंत्र्याच्या विचारलहरी उठत होत्या " त्या आनंदापुढें सर्व सुखें खरोखर तुच्छ आहेत. स्वातंत्र्याच्या पडींतील ओलीकोरडी भाकर ही पारतंत्र्याच्या प्रासादांतल्या पंचपक्कान्नाहूनहि अधिक रुचिकर लागते म्हणतात तें किती खरें आहे ! ” वसुदेव अशा रितीनें अंतर्बाह्य स्वातंत्र्यानें भरून राहिला. त्याचें हृदय स्वतंत्र, देह स्वतंत्र, मस्तकीं स्वातंत्र्यमूर्ति, आकाशांत व आजूबाजूस स्वतंत्र निसर्गाचा दिव्य आनंद ! अशा रितीनें सगळीकडे स्वातंत्र्याचे दिव्य दृश्य दिसत होतें ! श्रीकृष्णचरित्र लिहावयास बसलेले आम्ही स्वातंत्र्याच्या या गोष्टी करतांना पाहून कित्येकांस आश्चर्य वाटेल. पण त्याला आम्ही तरी काय करणार? कारण श्रीकृष्णाचें चरित्र ह्मणजे स्वातंत्र्याचें संगीत, चैतन्याचें गायन, सौंदर्याचा विलास व प्रेमाचें दिव्य मोहन आहे ! किंबहुना एकाच चित्कलेच्या ह्या चार प्रभा आहेत ! व त्यांचा जो इतिहास तेंच त्या प्रेममयाचें चरित्र असल्यामुळे आम्हीहि त्यांत रंगून जावें हें साहजिक आहे. अस्तु.

 झपाझप पावले टाकीत वसुदेव यमुनानदीतटाकीं येऊन उभा राहिला. रात्री एक वाजण्याचा समय होता. सर्वत्र शांत निस्तब्धता वास करीत होती. निशीथकालीन वायूच्या मंद शीतल लहरी वहात होत्या ! आकाशांत पसरलेल्या लक्षावधि तारकांच्या मंद प्रकाशांत यमुनानदीचे पात्र अंधुक दिसन होतें. निशावायूच्या लहरी जललहरी कंपित करीत होत्या. यमुना दुथडी भरून वहात होती. वसुदेवानें क्षणैक चौफेर दृष्टी फेंकली ! दूरवर त्याला आपण बाहेर पडलों त्या तुरुंगाचे तट अंधुक अंधुक दिसत होते ! वसुदेवानें नेसत्या धोतराची कांस मारून पुन्हां ती पाटी डोक्यावर घेतली व परमेश्वराचे चिंतन करीत बेधडक यमुनेंत पाय घातला. व शक्य तितक्या जलदीनें तो पाणी तोडीत चालला. कारण त्यास अजून बरेंच कार्य उरकायचें होतें. पण आज यमुनेने जणो त्याला अडविण्याचाच विचार केला होता कीं काय असें त्याला वाटलें. कारण तो जसजसा पुढे जाऊं लागला तसतसें यमुनेचें पाणी भराभर