पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११ ]

चढू लागले व लवकरच ते त्याच्या गळ्याशीं घेऊन भिडलें ! यमुनेचा खरोखरच वसुदेवास अडविण्याचा विचार होता काय ? छे ! स्वातंत्र्याच्या दिव्य संगीताचे आलाप छेडणारी नदी स्वातंत्र्यमूर्तीच्या निर्गमनाचे प्रसंगी आड येईल असें होईल तरी कसें ? स्वतंत्र जीवांना इतर स्वतंत्र जीव भेटले असतां उलट आनंदच होतो, व हर्षनिर्भर होऊन ते त्यास आलिंगन देण्यास धांवत असतात त्याला आनंदानें सामोरे जातात. साकार बनलेली स्वातंत्र्याची चिन्मय मूर्ति पाहून स्वतंत्र यमुनेच्या हृदयांत त्याच हर्षलहरी उठत होत्या ! व ती वसुदेवास अडविण्यास नव्हे तर प्रभूचें स्वागत करण्यास, त्याच्या पायावर आनंदानें लोळण घेण्यास, पारतंत्र्याच्या दुष्ट नरकांत गरीब जीवांस पचविणाऱ्या राक्षसांच्या मस्तकावर पदाघात करणाऱ्या प्रभूच्या स्वातंत्र्यप्रिय चरणकमलांचें दर्शन घेण्यास - ती जणो पुढें - वरवर सरकत होती – येत होती. स्वातंत्र्योपभोगी आकाशांतील तिच्या तारकामैत्रिणी प्रभुरायाचें दिव्य दर्शन अनिमिष नयनांनीं - आपल्या लुकलुकणाच्या डोळ्यांनी अतृप्तपणे घेत असतां यमुनानदीस ते घेतल्यावांचून कसें राहवेल ? इतकेंच नव्हे तर आकाशोद्यानांत फुललेलीं तीं हजारों हंसरी फुले जणों स्वर्गस्थ देवांनीं त्या प्रेममय परमेवराच्या अंगावर उधळण्यासाठी - निदान त्याच्या चरणावर वहाण्यासाठीं म्हणून नदीच्या पात्रांत लोटून दिलीं होतीं ! व यमुना त्यांना आपल्या ओंजळींत घेऊन त्या स्वातंत्र्याच्या पुष्पांनी त्या प्रेममयाची पूजा करण्यासाठी त्याच्या चरणावर ती वाहण्यासाठीं- प्रभुरायाच्या चरणाजवळ जवळ येऊं पहात होती ! परंतु तिच्या ह्या आनंदाच्या तन्मयवृत्तींत गरीब बिचाया वसुदेवाचा मात्र जीव गुदमरण्याची वेळ आली ! प्रभूनी आपल्या वडिलांवरील प्रसंग जाणला; तसेंच यमुनेच्या हृदयांत उठणाच्या काव्यमय तरंगांचाही त्यांना ओळख पटली व त्यांनी आपला पाय हलकेच पण पटकन् पाटीबाहेर टाकला ! झालें; स्वातंत्र्याचें दर्शन झालें ! बरोबर आणलेलीं फुलें यमुनेनें त्या विश्ववंद्य चरणांवर उधळलीं ! - - वाहिलीं. प्रभूची त्यांनीं पूजा केली; स्वतंत्र यमुनेनें स्वतंत्र प्रभूचें स्वतंत्र पुष्पांनीं पूजन केलें, तेव्हां तिचें भरून आलेलें हृदय ओसरले व नंतर हर्षनिर्भर हृदयानें अवाप्तकाम होऊन तिनें मोठ्या प्रेमानें व आनंदानें स्वातंत्र्यनिर्गमनास वाट दिली-यमुनेचें जल दोन बाजूंस विभागले गेलें. यमुना जणों प्रभूच्या जाण्यास मार्ग व्हावा म्हणून आपले जलवस्त्र सांवरूनच उभी राहिली ! वाट झाल्याबरोबर मिळालेल्या मार्गानें वसुदेव झपाट्यानें निघाला व लवकरच गोकुळींच्या परिसरांत येऊन उभा राहिला. भावनाप्रधान गोकुळां-