पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १२ ]

तील वातावरणांत शिरल्याबरोबर वसुदेवास कांही अलौकिकच सुख होऊं लागलें ! कृष्णकन्हय्याच्या श्यामसुंदर देहानी जेथील वृक्षपाषाणही विमोहित झाले, जेथील सर्व चराचर सृष्टि एखाद्या मंत्रमुग्ध नागाप्रमाणे ज्या प्रभूच्या मुरलीरवानें भविष्यत्कालांत गुंगून गेली त्या उत्तानभावनांनी भरलेल्या व भारलेल्या गोकुळांत आल्याबरोबर वसुदेवास कांहीं अननुभूतच अशा भावनांचें सौख्य होऊं लागलें ! “अहाहा! किती है वातावरण रमणीय ! भावनाप्रधान जीवांचें हें रम्य वसतिस्थान माझ्या बालकाच्या--स्वातंत्र्याच्या वाढीस योग्य ठिकाण आहे यांत तिळमात्र शंका नाहीं. मथुरेच्या पारतंत्र्यांतील त्या कोंदट हवेपेक्षां हैं रमणीय स्थलच त्या प्रभूच्या निवासास योग्य आहे. " बाळ ! तुमच्या आईच्या व सर्वांच्याच कल्याणासाठी मला गोकुळांत जाऊन रहावयास नको काय ? " है तुझें म्हणणें अगदी यथार्थ आहे ! " वसुदेवाच्या हृदयांत विचारलहरी उठत होत्या.

वसुदेव लवकरच नंदगृहाजवळ येऊन ठेपला. सर्वत्र शांत निस्तब्धता वसत होती. वसुदेव हलकेंच पाय न वाजवितां बाळंतिणीच्या खोलींत शिरला. खोलीत एका खाटेवर यशोदा प्रसवमूर्च्छत आपल्या लहानग्या बालिकेस जवळ स्तनाशीं-घेऊन निजली होती ! मातृस्तनपानाच्या दिव्य आनंदांत गुंगतां गुंगतां ती बालिका निद्रित होऊन तिच्या मुखांतील स्तन सुटून वेगळा झाला होता ! निद्रिस्त यशोदेचा बालिकेच्या अंगावरील हात ढिला पडला होता ! जवळच एक दोन दासी निजल्या होत्या. खोलींत एक लामण दिवा मंद मंद जळत होता; वसुदेव यशोदेच्या बाजेजवळ जाऊन उभा राहिला, व त्याने आपल्या मस्तकावरील पाटी खाली उतरून ठेवली त्यानें पार्टीत पाहिलें तो प्रभुरायाची बालमूर्ति निद्रानंदांत मग्न झालेली त्याला दिसली ! प्रभुरायास खरीच झोप लागली होती काय ? छे, प्रभुराज झोंपल्यावर विश्वाचा गाडा चालणें तरी शक्य आहे काय ? परमात्मा निजल्यावर सर्वानाच काळझोप घ्यावी लागेल, विश्वयंत्रांतील चक्रांची उलथापालथ होईल. श्रीकृष्णाची बालमूर्ति निजानंदांत रंगून स्वस्थ पहुडली होती. पण आमच्या वसुदेवास मायेमुळे आपले बाळ निजलें आहें असेंच वाटलें. वसुदेवास व पुढें यशोदेस परमात्म्यांनी आपलें परमात्मत्व कितीही पटवलें. तरी ' मायेने ' पुनः पुन्हां ' विमोहित ' होऊन त्यांना तो मानवी बालकच वाटे. असो. वसुदेवानीं हलकेच त्या बालकबालिकेची अदलाबदल केली. आपल्या पोटच्या गोळ्यास यशोदेच्या खाटेवर निजवितांना व यशोदेची बालिका आपल्या पार्टीत घेतांना त्यास