पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १३ ]

किती भडभडून आले असेल-किती जड हातानीं केवळ ईश्वराज्ञा म्हणून त्यांनीं तैं काम केलें असेल याची वाचकांनींच कल्पना करावी. यशोदेच्या बाजेवर पहुडलेल्या त्या श्यामसुंदर प्रभूच्या कमनीय मुखमंडलाकडे वसुदेवानें एकदां शेवटची दृष्टि टाकली ! त्याला अनिवार प्रेमाचा हुंदका दाटून आला, कंठ गहिवरला, नेत्रांतून अश्रुधारा वाहूं लागल्या ! आपल्या प्रिय बालकाचें त्यांनी शेवटचें चुंबन घेतलें. त्याबरोबर प्रभुरायांनी आपले नेत्रकमल उघडले व अत्यंत स्निग्ध व प्रेमळपणें ते आपल्या पित्याकडे पाहू लागले ! अहाहा ! त्या नेत्रांत जी प्रेमाची भरली होती तिचें कोठवर वर्णन करावें? " बाळा ! तुला माझ्या चुंबनाने त्रास झाला काय रे ? " कंठ गहिवरून येऊन स्फुंदत म्फुंदत हलक्या आवाजांत वसुदेव म्हणाले, “ नीज बाळा ! सुखानें नीज. बाळ ! तुला टाकून मला आतां जावें लागणार, या कल्पनेने माझ्या हृदयाची किती कालवाकालव होत आहे याची तुला काय कल्पना ? बाळ ! येतों बरं मी. ईश्वर ( ! ) तुझें सदैव कल्याण करो असा माझा तुला आशीर्वाद आहे " असें म्हणून वसुदेवानीं आपला हात प्रभूच्या मस्तकीं ठेवला. प्रभुराय गालांतल्या गालांत हंसले ! ते पाहून प्रभुस्वरूपाची पुन्हां आठवण होऊन आपल्या आशीर्वादांतील रम्य भोळेपणा लक्षांत येऊन वसुदेव त्यांतल्यात्यांत हंसून म्हणतो " देवा ! मग त्यांत काय झाले मोठेंसे ! काडवातीने सूर्यास ओवाळीत ' नाहीतका ? त्यांतलाच आपला माझा आशीर्वाद समजा ! " असे म्हणून व जास्त गडबड करणे युक्त नाहीं हें लक्षांत येऊन वसुदेवानें ती बालिकेची पाटी मोठ्या कष्टानें डोक्यावर घेतली व अत्यंत जड पावलांनीं तो त्या स्वातंत्र्यसदनांतून बाहेर पडला ! “ देवा ! " वसुदेव वाट चालतां चालतां स्वताशींच म्हणाला " स्वधर्माचें रक्षण करण्यास व अधर्माचा पाडाव करण्यास, ' पतिव्रतांचे पाठीराखे परमेश्वर ! आपण इथेंच रहा व नंदाच्या येथील गोरसावर यथेच्छ बलवान होऊन कंस-चाणूरादि दुष्टांच्या त्रासानें पृथ्वी गांजून गेली आहे तिला त्यापासून मुक्त करा !"

 अत्यंत मंदपणें पावले टाकीत वसुदेव त्याच यमुनेच्या तीरीं येऊन उभा राहिला ! स्वातंत्र्याचा वियोग झाल्यामुळेच की काय नदीचे पात्र ओसरून जाऊन यमुना आतां मघाच्या जोराने वहात नव्हती ! वसुदेवानें मोठ्या कष्टानें नर्दीत पाय घातला व तो कसबसा पैलतीरास आला. आपण जसजसे स्वातंत्र्यापासून दूर दूर जात आहों तसतसें पारतंत्र्याच्या भीषण तुरुंगाचें द्वार आपण जवळ करीत आहों याची त्यास पदोपदी